दिवेआगर समुद्रकिनारी पर्यटकांची धोकादायक स्टंटबाजी; पोलिसांकडून कारवाई

रायगडच्या दिवेआगर समुद्रकिनारी पर्यटकांनी वाहनांसह धोकादायक स्टंटबाजी केल्याचा प्रकार समोर आला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे.

Apr 15, 2026 - 00:55
 0  60
दिवेआगर समुद्रकिनारी पर्यटकांची धोकादायक स्टंटबाजी; पोलिसांकडून कारवाई
दिवेआगर स्टंटबाजी, रायगड पर्यटन, beach stunt Maharashtra, tourist stunt case, Diveagar news, motor vehicle act case

बोर्लीपंचतन प्रतिनिधी : उदय कळस

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध दिवेआगर समुद्रकिनारी काही पर्यटकांनी जीव धोक्यात घालून वाहनांसह स्टंटबाजी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या थरारक प्रकारामुळे परिसरातील नागरिक आणि इतर पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

दिवेआगर समुद्रकिनारा हा महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक असून ‘मिनी गोवा’ म्हणूनही ओळखला जातो. दरवर्षी राज्यभरातून हजारो पर्यटक येथे पर्यटनासाठी येतात. मात्र, काही पर्यटक नियमांकडे दुर्लक्ष करून वाहनांसह धोकादायक स्टंट करत असल्याचे समोर आले आहे.

सदर घटनेत काही पर्यटकांनी समुद्रकिनारी वाहन चालवत स्टंटबाजी केली. हा प्रकार इतका धोकादायक होता की पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारे उभे राहिले. स्थानिकांच्या मते, रायगडमध्ये अशा प्रकारची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत दिघी सागरी पोलीस ठाण्याने संबंधित पर्यटकांविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे. क्रेटा कार चालकाविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक २५/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१, १२५ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पोलीस प्रशासनाने पर्यटकांनी नियमांचे पालन करावे आणि जीव धोक्यात घालणारे प्रकार टाळावेत, असे आवाहन केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0