बुलढाणा : महावितरणची मान्सूनपूर्व देखभाल-दुरुस्तीची कामे आता सकाळच्या सत्रात

उन्हाळ्यात वाढत्या वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून सुरू असलेली देखभाल व दुरुस्तीची पूर्वनियोजित कामे आता सकाळी ७ ते ११ या वेळेत करण्यात येणार आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना निर्देश देण्यात आले आहेत.

Apr 26, 2026 - 14:21
 0  20
बुलढाणा : महावितरणची मान्सूनपूर्व देखभाल-दुरुस्तीची कामे आता सकाळच्या सत्रात
बुलढाणा, महावितरण, मान्सूनपूर्व कामे, वीजपुरवठा

विदर्भ ब्यूरो| अमोल सराफ 

बुलढाणा 

महावितरणच्या मान्सूनपूर्व देखभाल, दुरुस्तीची पूर्वनियोजित कामे आता सकाळच्या सत्रात होणार

उन्हाळ्यात विजेच्या वाढत्या मागणीच्या कालावधीत तसेच आगामी पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून वीज यंत्रणेशी संबंधित विविध देखभाल व दुरुस्तीची पूर्वनियोजित कामे सध्या वेगाने सुरू आहेत. मात्र उन्हाच्या तडाख्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ही कामे आता सकाळच्या सत्रात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महावितरण मुख्यालयाकडून शनिवारी क्षेत्रीय कार्यालयांना यासंदर्भात निर्देश जारी करण्यात आले. त्यानुसार संबंधित दिवशी सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत, असे सांगण्यात आले आहे.

महावितरणकडून प्रामुख्याने पावसाळ्यात वीजयंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी तसेच वीजपुरवठा खंडित होणे आणि वीजसुरक्षेचे धोके टाळण्यासाठी ग्राहकांना पूर्वसूचना देऊन राज्यभरात ही कामे केली जात आहेत. साधारणतः मे महिन्याच्या अखेरीस ही सर्व कामे पूर्ण केली जातात.

सद्यस्थितीत सकाळी १० ते दुपारी २ किंवा काही ठिकाणी सायंकाळी ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवून देखभाल व दुरुस्तीची कामे सुरू होती. मात्र ही वेळ नागरिकांसाठी गैरसोयीची ठरत असल्याने आता सकाळी ७ ते ११ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे.

तसेच, महावितरणने देखभाल-दुरुस्तीच्या कामांदरम्यान शक्य तितक्या ठिकाणी पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश दिले आहेत. याशिवाय संबंधित ग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे तसेच प्रसिद्धी माध्यमांद्वारे माहिती देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0