उष्माघातापासून बचावासाठी आरोग्य विभागाचे सतर्कतेचे आवाहन
बुलढाणा जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघात टाळण्यासाठी आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
बुलढाणा प्रतिनिधी महेंद्र मिश्रा
बुलढाणा, दि. 16 : उन्हाच्या तीव्रतेत वाढ होत असताना उष्माघाताच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी केले आहे. उष्माघाताचे गंभीर परिणाम होऊ शकतात, त्यामुळे योग्य वेळी प्रथमोपचार आणि आवश्यक खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
उन्हाच्या लाटेदरम्यान हलके व पचायला सोपे अन्न, फळे आणि सॅलडचा आहार घ्यावा. शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच सूती, सैल आणि फिकट रंगाचे कपडे परिधान करावेत.
उष्माघातापासून बचावासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी पाणी पिणे, डोके झाकणे आणि लिंबूपाणी, ओआरएस, आंबा पन्हे यांसारखे द्रवपदार्थ सेवन करणे फायदेशीर ठरते. रिकाम्या पोटी बाहेर पडणे, दीर्घकाळ उन्हात राहणे तसेच तिखट, मसालेदार आणि जड अन्न सेवन टाळावे.
एखाद्या व्यक्तीचे शरीराचे तापमान खूप वाढलेले असेल, ती बेशुद्ध किंवा गोंधळलेल्या अवस्थेत असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर तात्काळ १०८ किंवा १०२ या आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधून वैद्यकीय मदत घ्यावी.
उन्हाच्या लाटेकडे दुर्लक्ष न करता आवश्यक ती काळजी घेऊन स्वतःसह कुटुंबाचे संरक्षण करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0