जागतिक योगासन स्पर्धेत कोल्हापूरच्या खेळाडूंची चमक; जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते सत्कार

अहमदाबाद येथे झालेल्या पहिल्या जागतिक योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेत कोल्हापूरच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण व रौप्यपदके पटकावली. पदक विजेते खेळाडू आणि प्रशिक्षकांचा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Jun 11, 2026 - 20:29
 0  1
जागतिक योगासन स्पर्धेत कोल्हापूरच्या खेळाडूंची चमक; जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते सत्कार
कोल्हापूर योगासन स्पर्धा, जागतिक योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप,

कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : पहिल्या जागतिक योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून पदके जिंकणाऱ्या कोल्हापूरच्या खेळाडूंचा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी खेळाडूंचे कौतुक करत कोल्हापूरला क्रीडा क्षेत्रात अग्रस्थानी ठेवण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा आणि सहकार्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

अहमदाबाद (गुजरात) येथील ट्रान्स स्टेडिया स्टेडियममध्ये 4 ते 8 जून दरम्यान झालेल्या पहिल्या जागतिक योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील तीन खेळाडूंनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

स्पर्धेत सीनियर ‘ब’ गटातील सुपाईन प्रकारात रोहित चव्हाण, ज्युनिअर गटातील फॉरवर्ड बेंडिंग प्रकारात वृंदा भुतडा आणि सब-ज्युनिअर गटातील फॉरवर्ड बेंडिंग तसेच पारंपरिक सांघिक प्रकारात निवेश पाटील यांनी सहभाग नोंदवला.

या स्पर्धेत वृंदा भुतडा हिने सुवर्णपदक, निवेश पाटील याने दोन सुवर्णपदके, तर रोहित चव्हाण याने रौप्यपदक पटकावत कोल्हापूर जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले.

स्पर्धेत यश मिळवलेल्या खेळाडूंसह त्यांचे प्रशिक्षक राज्य क्रीडा मार्गदर्शक रविभूषण कुमठेकर आणि सुहास पवळे यांचाही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी क्रीडा व युवक सेवा विभाग, कोल्हापूरचे उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद, इचलकरंजी तसेच सरदार तालीम मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जागतिक स्तरावरील या यशामुळे कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राची मान उंचावली असून, युवा खेळाडूंना प्रेरणा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0