विक्रोळी पार्कसाईटमध्ये रस्तादुरुस्तीचा फज्जा; तीन दिवसांतच रस्ता खचल्याने बीएमसीच्या कामावर प्रश्नचिन्ह

विक्रोळी पार्कसाईट येथील संदेश विद्यालयासमोरील रस्त्यावरील खड्डा तीन दिवसांपूर्वीच दुरुस्त करण्यात आला होता. मात्र डंपरच्या वजनामुळे रस्ता पुन्हा खचल्याने महानगरपालिकेच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांनी संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

Jun 20, 2026 - 19:35
 0  11
विक्रोळी पार्कसाईटमध्ये रस्तादुरुस्तीचा फज्जा; तीन दिवसांतच रस्ता खचल्याने बीएमसीच्या कामावर प्रश्नचिन्ह
विक्रोळी पार्कसाईट येथील संदेश विद्यालयासमोरील रस्ता अवघ्या तीन दिवसांत खचल्याने रस्तादुरुस्तीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुंबई, प्रतिनिधी नरेश शिंदे: विक्रोळी पार्कसाईट येथील संदेश विद्यालयासमोरील रस्त्यावरील खड्डा अवघ्या तीन दिवसांपूर्वी महानगरपालिकेकडून दुरुस्त करण्यात आला होता. मात्र डंपरच्या वजनामुळे हा भाग पुन्हा खचल्याने रस्तादुरुस्तीच्या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यावरील खड्डा बुजवताना काँक्रिट टाकण्यासाठी योग्य तांत्रिक प्रक्रिया न पाळता हार्डनर शीट व पातळ फळ्यांचा वापर करण्यात आला. त्यामुळे दुरुस्तीचे काम केवळ औपचारिकता म्हणून करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

घटनेनंतर सोशल मीडियावर संबंधित छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल झाले असून, "अवघ्या तीन दिवसांतच रस्त्याची दुरवस्था कशी झाली?" असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. लाखो रुपयांचा खर्च दाखवून करण्यात आलेल्या कामाचा दर्जा इतका निकृष्ट कसा राहिला, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि महापौर यांच्याकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि झालेल्या नुकसानीची भरपाई वसूल करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आज डंपर अडकला असून उद्या एखादा गंभीर अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणाबाबत महानगरपालिकेकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र रस्तादुरुस्तीच्या कामातील कथित हलगर्जीपणा आणि निकृष्ट दर्जाच्या आरोपांमुळे प्रशासन पुन्हा एकदा टीकेच्या केंद्रस्थानी आले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0