चेंबूरमधील माता-बाल आरोग्य सेवा आणि प्राथमिक आरोग्य सुविधांचा हरिष भांदिर्गे यांनी घेतला आढावा
मुंबई महानगरपालिका आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी चेंबूरमधील माँ रुग्णालय, माता रमाबाई आंबेडकर प्रसूतीगृह, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि चेंबूर वसाहत दवाखान्याला भेट देऊन आरोग्य सेवा, माता-बाल संगोपन सुविधा आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा सविस्तर आढावा घेतला.
मुंबई ब्यूरो अनिल सावरे
मुंबई, दि. २० जून २०२६ : मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी आज चेंबूर परिसरातील विविध आरोग्य केंद्रांना भेट देऊन तेथील आरोग्य सेवा, उपलब्ध सुविधा आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा सविस्तर आढावा घेतला.
या पाहणी दौऱ्यात माँ रुग्णालय, माता रमाबाई आंबेडकर प्रसूतीगृह, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि चेंबूर वसाहत दवाखाना (डिस्पेन्सरी सेंटर) या आरोग्य संस्थांचा समावेश होता. एम पश्चिम प्रभाग समितीच्या अध्यक्षा आशाताई मराठे यांच्या उपस्थितीत हा दौरा पार पडला.
भेटीदरम्यान हरिष भांदिर्गे यांनी आशा सेविका, नवमाता आणि रुग्णांशी थेट संवाद साधून त्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध आरोग्य सुविधांची माहिती घेतली. नवजात बालकांसाठी दिल्या जाणाऱ्या उपचार सेवा, माता व बाल संगोपनाशी संबंधित सुविधा तसेच रुग्णालयातील आवश्यक बाबींचा त्यांनी आढावा घेतला.
यावेळी डॉक्टर आणि आरोग्य अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून उपचार प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणी, मनुष्यबळाची उपलब्धता, दैनंदिन कामकाजातील समस्या आणि रुग्णालयाच्या एकूण कार्यपद्धतीची माहिती जाणून घेण्यात आली. माता आणि बालकांचे आरोग्य अधिक सक्षम करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असून आरोग्य यंत्रणा अधिक परिणामकारक करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
तसेच प्रसूतीगृहालगत असलेल्या ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ येथेही भेट देऊन रुग्णसेवा, उपचार पद्धती, नागरिकांना उपलब्ध सुविधा आणि संपूर्ण कार्यप्रणालीची पाहणी करण्यात आली.
यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या चेंबूर वसाहत दवाखान्यात भेट देऊन औषधसाठा, उपलब्ध आरोग्य सेवा, प्रशासकीय व्यवस्था आणि दैनंदिन कामकाजाचा आढावा घेण्यात आला. उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांच्या समस्या, गरजा आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या सेवांबाबतही माहिती घेण्यात आली.
माता, बालके आणि सर्वसामान्य नागरिकांना अधिक दर्जेदार, सुलभ आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या पाहणी दौऱ्यावेळी एम पश्चिम प्रभाग समितीच्या अध्यक्षा आशाताई मराठे, नगरसेवक महादेव शिवगन, रुग्णालयातील डॉक्टर, आरोग्य समितीचे अधिकारी, आशा सेविका आणि संबंधित कर्मचारी उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0