गणेश विसर्जनाच्या नियोजनाचे देशभरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक
स्वराज्यभूमी गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाच्या नियोजनाची देशभरातील वरिष्ठ महसुली अधिकारी आणि तज्ज्ञांच्या अभ्यास पथकाने पाहणी केली. बीएमसी, मुंबई पोलीस आणि संबंधित यंत्रणांच्या व्यवस्थापनाचे कौतुक.
प्रतिनिधी : नरेश शिंदे
मुंबई, दि. २० सप्टेंबर २०२६ : मुंबईतील श्रीगणेशमूर्ती विसर्जनाच्या नियोजनाचा आणि गर्दी व्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासाठी देशभरातील वरिष्ठ महसुली अधिकारी आणि तज्ज्ञांच्या पथकाने स्वराज्यभूमी, गिरगाव चौपाटी येथे पाहणी केली. गणेश विसर्जनासाठी करण्यात आलेले नियोजन, विविध नागरी सुविधा, आपत्कालीन व्यवस्थापन आणि विविध यंत्रणांमधील समन्वयाची माहिती घेतल्यानंतर पथकाने बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस आणि संबंधित यंत्रणांच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले.
भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) मुंबई यांच्या ‘सार्वजनिक धोरण व्यवस्थापन कार्यक्रम’ (PGPEx-PPM) अंतर्गत या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. भव्य सार्वजनिक कार्यक्रमांचे नियोजन, नागरी प्रशासन आणि क्षेत्रीय अंमलबजावणीचा प्रत्यक्ष अनुभव मिळविणे हा या दौऱ्याचा उद्देश होता.
गिरगाव चौपाटीवरील व्यवस्थेची पाहणी
मुंबईत सर्वाधिक गणेशमूर्ती विसर्जन होणाऱ्या स्वराज्यभूमी, गिरगाव चौपाटी येथे महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सहाय्यक आयुक्त (डी विभाग) संतोष साळुंके यांनी अभ्यास पथकाला प्रत्यक्ष व्यवस्थेची माहिती दिली.
विसर्जनासाठी येथे २० मनोरे, १२ कृत्रिम तलाव, ९० प्रसाधनगृहे, २२ तराफे, सुमारे १,१९४ जर्मन/स्टील प्लेट्स, २२ निर्माल्य कलश, प्राथमिक आरोग्य केंद्र, ५४८ फ्लड लाईट, ११ सर्च लाईट, ३ रुग्णवाहिका आणि सुमारे १ हजार मनुष्यबळ सज्ज ठेवण्यात आले आहे.
वाळूमध्ये विसर्जनासाठी येणारी वाहने अडकू नयेत यासाठी सुमारे १,२०० लोखंडी प्लेट्स टाकण्यात आल्या आहेत. सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींसाठी कृत्रिम तलाव, पिण्याचे पाणी, फिरती शौचालये, आरोग्य कक्ष, जीवरक्षक आणि नियमित स्वच्छता व्यवस्थाही करण्यात आली आहे.
आपत्कालीन व्यवस्थापन आणि गर्दी नियंत्रणाची माहिती
प्रमुख अधिकारी (आपत्कालीन व्यवस्थापन विभाग) रश्मी लोखंडे यांनी मुंबईतील आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा आणि गणेश विसर्जनाच्या नियोजनाचे सादरीकरण केले.
यामध्ये नियंत्रण कक्षाची कार्यपद्धती, आंतरसंस्थात्मक समन्वय, गर्दी व्यवस्थापन, वाहतूक नियमन, आपत्कालीन प्रतिसाद, आरोग्य व स्वच्छता व्यवस्था, पर्यावरणपूरक उपाययोजना आणि रिअल-टाइम मॉनिटरिंग याबाबत माहिती देण्यात आली.
सहायक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर वाघ यांनी पोलीस विभागाच्या सुरक्षा उपाययोजना, गर्दीचे नियोजन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या वापराबाबत अभ्यास पथकाला माहिती दिली.
चोख समन्वयाचे अधिकाऱ्यांकडून कौतुक
लाखो भाविक एकत्र येत असताना त्यांची सुरक्षा, आरोग्य आणि नागरी सुविधांची काळजी घेत विसर्जन सोहळा शांततेत व शिस्तीत पार पाडण्यासाठी करण्यात आलेले नियोजन हे सार्वजनिक व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचे उदाहरण असल्याचे अभ्यास पथकातील अधिकाऱ्यांनी नमूद केले.
महानगरपालिका, मुंबई पोलीस आणि अन्य संबंधित यंत्रणांमधील समन्वय, नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे मोठ्या प्रमाणातील गणेश विसर्जनाचे व्यवस्थापन प्रभावीपणे करता येत असल्याचे त्यांनी सांगितले.
देशभरातील अधिकारी व तज्ज्ञांचा सहभाग
या अभ्यास पथकात वित्त मंत्रालयातील प्रधान आयकर आयुक्त सी. चंद्रकांता, सह आयुक्त हरिता नेनावत, सह आयुक्त जितेश कुमार जैन, पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाचे वरिष्ठ उपसंचालक कुलदीप शर्मा, महसूल विभागाचे सह आयुक्त वैभव कुमार सिंग, एनडीएमसीचे संचालक क्रिशन कुमार, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे संचालक अंशुमान मिश्रा, जिल्हा न्यायाधीश सोनल सुनीलजीत पाटील, इंडियन बँकेच्या व्यवस्थापक स्नेहल पांडुरंग निमसे, निर्मिती प्रोमॅक कन्सल्टंट्सचे व्यवस्थापकीय संचालक राहुल वसंत वैद्य, जनरेशन इंडिया फाउंडेशनचे उपाध्यक्ष गौरांग दयाल, कौटिल्य वोरोल्डचे वरिष्ठ सल्लागार आदित्य अशोक आणि अर्न्स्ट अँड यंग एलएलपीचे प्रकल्प संचालक सिद्धार्थ चौधरी यांचा समावेश होता.
यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संबंधित अधिकारीही उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0