१५०० कोटी रुपयांच्या निधीतून श्री अंबाबाई मंदिर कॉरिडॉरचा विकास; भाविकांसाठी अभिमानाचा क्षण – अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर येथील कृतज्ञता सोहळ्यात श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर परिसराचा सुमारे १५०० कोटी रुपयांच्या निधीतून कॉरिडॉर म्हणून विकास करण्यात येणार असल्याची घोषणा केली. या प्रकल्पामुळे मंदिर संवर्धन, भाविकांसाठी आधुनिक सुविधा आणि धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Jun 20, 2026 - 19:47
 0  5
१५०० कोटी रुपयांच्या निधीतून श्री अंबाबाई मंदिर कॉरिडॉरचा विकास; भाविकांसाठी अभिमानाचा क्षण – अमित शहा
अमित शहा, अंबाबाई मंदिर कॉरिडॉर, महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर

कोल्हापूर प्रतिनिधी:  उमेश जाधव 

कोल्हापूर, दि. २० (जिमाका) : दक्षिण भारताची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर परिसराचा सुमारे १५०० कोटी रुपयांच्या निधीतून विकास करण्यात येणार असून हा परिसर आधुनिक मंदिर कॉरिडॉर म्हणून विकसित केला जाणार आहे. ही बाब कोट्यवधी भाविकांसाठी अभिमानाची असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी केले.

पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित कृतज्ञता सोहळा सभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने तसेच अन्य लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते.

४१ मंदिरांचे संवर्धन, परिसराचा सर्वांगीण विकास

अमित शहा म्हणाले की, सातव्या शतकातील या प्राचीन मंदिराच्या परिसरातील सुमारे ४१ लहान-मोठ्या मंदिरांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यात येणार आहे. पुढील सहा महिन्यांत परिसर विकासाची कामे गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच भाविकांसाठी अन्नछत्र सुरू करण्याबाबतही शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे जतन व संवर्धन करणे हे केंद्र आणि राज्य सरकारचे प्रमुख ध्येय असल्याचे स्पष्ट करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने आर्थिक, संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात मोठी प्रगती साधल्याचे नमूद केले. देशातील घुसखोरांविरोधात कठोर कारवाई सुरू राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

"कोल्हापूर ही सहकाराची आद्य पंढरी" – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक शक्ती नव्याने उभी राहत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आग्रहामुळे अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याला गती मिळाली.

राज्यातील पाच ज्योतिर्लिंगांसह जोतिबा मंदिराचा विकासही सुरू असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, हा आराखडा पुढील शंभर वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. कोल्हापूर हे केवळ शक्तिपीठ नाही, तर सहकाराची आद्य पंढरी आहे. सहकार क्षेत्रात अमित शहा यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी नमूद केले.

"कोल्हापूरला नवी ओळख मिळेल" – एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अंबाबाई मंदिर परिसरातील आधुनिकीकरण आणि सुशोभीकरणाच्या कामांचा आज शुभारंभ झाला असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळेल. महाराष्ट्राने देशाला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात दिलेले योगदान अधोरेखित करत त्यांनी अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली देशातील नक्षलवादावर प्रभावी नियंत्रण मिळविल्याचा उल्लेख केला.

भाविकांसाठी सुविधा वाढणार

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी हा तीर्थक्षेत्र विकास आराखडा कोल्हापूरकरांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले. या प्रकल्पामुळे भाविकांना अधिक सुविधा उपलब्ध होतील तसेच धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महालक्ष्मीची मूर्ती आणि तलवार देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि महापौर रुपाराणी निकम यांनी मंदिर विकास आराखड्याची प्रत त्यांना सुपूर्द केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक खासदार धनंजय महाडिक यांनी केले, तर आभार प्रदर्शन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. कार्यक्रमस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0