मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन; अमित शहा यांच्या कार्यक्रमात होणार सहभाग
श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर परिसरातील विकासकामांच्या शुभारंभ सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विविध कार्यक्रमांना तसेच इचलकरंजीतील शेतकरी मेळावा आणि सहकारी बँकेच्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत.
कोल्हापूर, दि. २० : श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर परिसरातील विविध विकासकामांच्या शुभारंभ सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शनिवारी सकाळी १० वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.
शुक्रवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कोल्हापूरमध्ये आगमन झाले होते. कोल्हापूर आणि इचलकरंजीच्या एकदिवसीय दौऱ्यासाठी ते येथे आले असून त्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृह येथे होता.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत शनिवारी सकाळी ११ वाजता श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर परिसरातील विविध विकासकामांचा शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मंत्रिमंडळातील अन्य सदस्य उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय पोलीस परेड ग्राउंड येथे आयोजित जाहीर सभा, इचलकरंजी येथील जनता सहकारी बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन, शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नामविस्तार सोहळा आणि शेतकरी मेळावा या कार्यक्रमांनाही मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. दिवसभरातील कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर ते सायंकाळी सुमारे ६ वाजता मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.
राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार हे देखील मुख्यमंत्र्यांसोबत या दौऱ्यासाठी कोल्हापूर येथे आले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वागतासाठी विमानतळावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार अभिमन्यू पवार, आमदार अशोकराव माने, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार राहुल आवाडे, विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, विजय जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
श्री महालक्ष्मी मंदिर विकास आराखड्याच्या शुभारंभामुळे कोल्हापूरच्या धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्यासह भाविकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0