आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मरीन ड्राईव्हवर ‘योगा बाय द बे’चे भव्य आयोजन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी मुंबईच्या मरीन ड्राईव्ह चौपाटी येथे ‘योगा बाय द बे’ अंतर्गत भव्य योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह विविध मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
मुंबई, प्रतिनिधी (मिलिंद कारेकर) : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबईतील नागरिकांसाठी मरीन ड्राईव्ह चौपाटी येथे ‘योगा बाय द बे’ अंतर्गत भव्य योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २१ जून रोजी सकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम कीलाचंद चौक, सुंदरमहल जंक्शन, मरीन ड्राईव्ह येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच विविध क्षेत्रांतील लोकप्रतिनिधी आणि मान्यवरही कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारच्या पूर्वनोंदणीची आवश्यकता नसून प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘मुंबई माझी लाडकी’, टाइम्स ऑफ इंडिया, कोस्ट गार्ड, द योगा इन्स्टिट्यूट, हार्टफुलनेस, तेरापंथ युवक परिषद दक्षिण मुंबई आणि डी आर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समुद्रकिनाऱ्याच्या आल्हाददायक वातावरणात आणि सागरी हवेत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगासने, प्राणायाम आणि विविध योग प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाच्या निमंत्रक शायना एन. सी. यांनी नागरिकांना निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करण्यासाठी आणि शारीरिक तसेच मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम मुंबईकरांसाठी आरोग्य, तंदुरुस्ती आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
