महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी महाराष्ट्रात ‘महिला स्टार्टअप हब’; राज्य नावीन्यता सोसायटी आणि उदैती फाउंडेशनमध्ये करार

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी आणि उदैती फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारातून महाराष्ट्रात महिला स्टार्टअप हब स्थापन होणार असून महिला उद्योजकांना वित्तपुरवठा, मार्गदर्शन आणि बाजारपेठेची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Jun 20, 2026 - 01:52
Jun 20, 2026 - 01:53
 0  6
महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी महाराष्ट्रात ‘महिला स्टार्टअप हब’; राज्य नावीन्यता सोसायटी आणि उदैती फाउंडेशनमध्ये करार
महिला स्टार्टअप हब, महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी, उदैती फाउंडेशन,

प्रतिनिधी नरेश शिंदे 

मुंबई : राज्यातील महिला उद्योजकतेला नवी दिशा देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी आणि उदैती फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. या कराराच्या माध्यमातून महाराष्ट्रात ‘महिला उद्योजकता स्टार्टअप हब’ स्थापन करण्यात येणार असून महिला उद्योजकांना उद्योग क्षेत्रात अधिक संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी या उपक्रमामुळे राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळेल आणि महिला उद्योजकांसाठी अधिक अनुकूल वातावरण निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या कराराअंतर्गत महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी आणि उदैती फाउंडेशन तांत्रिक व ज्ञान भागीदार म्हणून काम करणार आहेत. महिला उद्योजकांना वित्तपुरवठा, बाजारपेठेपर्यंत पोहोच, व्यवसायवृद्धीसाठी मार्गदर्शन आणि विविध सहाय्य सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री Mangal Prabhat Lodha यांच्या नेतृत्वाखाली हा करार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील आणि उदैती फाउंडेशनच्या संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा शर्मा गोयल यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

प्रस्तावित महिला उद्योजकता स्टार्टअप हब हे राज्यातील स्टार्टअप परिसंस्थेतील विविध घटकांना एकत्र आणणारे व्यासपीठ म्हणून कार्य करणार आहे. शासनाचे विविध विभाग, उद्योग क्षेत्र, वित्तीय संस्था आणि सहाय्यक संघटनांमध्ये समन्वय साधून महिला उद्योजकांसाठी अधिक संधी निर्माण करण्याचे काम या हबमार्फत केले जाणार आहे.

या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील महिला-नेतृत्वाखालील उद्योगांसाठी विशेष ‘अ‍ॅक्सेलरेटर मॉडेल’ विकसित करण्यात येणार आहे. या मॉडेलद्वारे उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन, बाजारपेठेतील संधी, वित्तपुरवठा, नेटवर्किंग आणि राज्य तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनांशी जोडणी करण्यात मदत केली जाईल.

याशिवाय, राज्यासाठी महिला स्टार्टअप निर्देशांक (Women Startup Index) विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. या निर्देशांकाच्या माध्यमातून जिल्हानिहाय आणि विभागनिहाय महिला उद्योजकतेच्या प्रगतीचा अभ्यास करता येणार असून त्याद्वारे पुराव्यावर आधारित धोरणनिर्मितीला अधिक बळ मिळेल.

शासनाच्या विविध विभागांची कामगिरी आणि महिला उद्योजकतेशी संबंधित उपक्रमांचे निरीक्षण करण्यासाठी ‘गव्हर्नन्स डॅशबोर्ड’ देखील विकसित करण्यात येणार आहे. तसेच ‘वुई इंडेक्स’ (WE Index) प्रभावीपणे राबविण्यासाठी आंतरविभागीय संचालन समिती स्थापन करण्यात येणार असून विविध विभागांमधील समन्वय अधिक मजबूत करण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील महिला उद्योजकांना उद्योग क्षेत्रात अधिक संधी, संसाधने आणि मार्गदर्शन उपलब्ध होऊन महिला-नेतृत्वाखालील स्टार्टअप्सच्या वाढीस मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0