देव द्या, देवपण घ्या’ उपक्रमाला नाशिककरांचा विक्रमी प्रतिसाद; सुमारे ३८०० गणेशमूर्तींचे संकलन

गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नाशिकमध्ये १६ वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या ‘देव द्या, देवपण घ्या’ उपक्रमाला यंदा विक्रमी प्रतिसाद मिळाला. गोदापार्क येथे सुमारे ३८०० गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले. अभिनेता अभिजित खांडकेकर यांनीही आपल्या घरची गणेशमूर्ती दान केली.

Sep 27, 2026 - 10:23
 0  5
देव द्या, देवपण घ्या’ उपक्रमाला नाशिककरांचा विक्रमी प्रतिसाद; सुमारे ३८०० गणेशमूर्तींचे संकलन
देव द्या देवपण घ्या, नाशिक गणेश विसर्जन, गणेशमूर्ती दान, ३८०० गणेशमूर्ती, गोदावरी प्रदूषण, गोदापार्क नाशिक,

नाशिक ब्यूरो:

नाशिक, दि. २६ (प्रतिनिधी) : गोदावरी नदीला प्रदूषणापासून वाचविण्यासाठी गेल्या १६ वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या ‘देव द्या, देवपण घ्या’ या उपक्रमाला यंदा नाशिककरांनी उत्स्फूर्त आणि विक्रमी प्रतिसाद दिला. यापूर्वीचे मूर्तीदानाचे विक्रम मोडीत काढत चोपडा लाँन्सजवळील गोदापार्क येथे सुमारे ३८०० गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आल्याची माहिती उपक्रमाचे संयोजक आकाश पगार यांनी दिली.

गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मूर्ती आणि निर्माल्य नदीपात्रात विसर्जित न करता त्यांचे दान करण्याच्या उद्देशाने १६ वर्षांपूर्वी ‘देव द्या, देवपण घ्या!’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला छोटेसे रोपटे म्हणून सुरू झालेल्या या उपक्रमाचा विस्तार आता मोठ्या प्रमाणात झाला असून, महाराष्ट्रातील विविध ठिकाणी या संकल्पनेचे अनुकरण केले जात असल्याचे संयोजकांनी सांगितले.

गोदापार्क येथे सकाळपासून मूर्ती संकलन

गणेश विसर्जनाच्या निमित्ताने चोपडा लाँन्सजवळील गोदापार्क येथे सकाळी ८ वाजल्यापासून ‘देव द्या, देवपण घ्या’ उपक्रमाचे कार्यकर्ते गणेशमूर्ती स्वीकारण्यासाठी उपस्थित होते. गणेशभक्तांसाठी याठिकाणी आरती करण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती.

पिवळ्या रंगाचे आकर्षक कुर्ते परिधान केलेले कार्यकर्ते गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत होते. भाविकांकडून मूर्ती अत्यंत श्रद्धा आणि भावपूर्ण वातावरणात कार्यकर्त्यांकडे सुपूर्द करण्यात येत होत्या.

गोदावरी प्रदूषणाविरोधात जनजागृती

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, रासायनिक रंग, सजावटीच्या वस्तू तसेच निर्माल्यामुळे गोदावरी नदीच्या प्रदूषणात वाढ होते. हे प्रदूषण रोखण्यासाठी गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत ‘सुविचार मंच’च्या कार्यकर्त्यांनी घराघरात जनजागृती करणारी पत्रके वाटली. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही पर्यावरणपूरक विसर्जनाबाबत प्रभावी प्रचार आणि आवाहन करण्यात आले.

या आवाहनाला नाशिकमधील गोदाप्रेमी नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. दीड, पाच आणि सात दिवसांच्या घरगुती गणेशोत्सवातील गणेशमूर्तीही या उपक्रमांतर्गत स्वीकारण्यात आल्या.

लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सहभाग

मूर्तीदानासाठी लहान मुलांपासून वयोवृद्ध नागरिकांपर्यंत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. आपल्या लाडक्या गणरायाची मूर्ती पर्यावरणाच्या रक्षणासाठी दान करताना अनेक भाविक भावुक झाल्याचे चित्र गोदापार्क परिसरात पाहायला मिळाले.

उपक्रमाच्या माध्यमातून गणेशभक्ती आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर समन्वय साधण्यात आला. नदीचे प्रदूषण टाळून गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

अभिनेता अभिजित खांडकेकर यांचाही सहभाग

मराठी अभिनेते अभिजित खांडकेकर यांनीही ‘देव द्या, देवपण घ्या’ या उपक्रमात सहभागी होत आपल्या घरची गणेशमूर्ती कार्यकर्त्यांकडे सुपूर्द केली. त्यांच्या सहभागामुळे उपक्रमाला आणखी प्रसिद्धी मिळाली.

कार्यकर्त्यांचे योगदान

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश पगार, विशाल गांगुर्डे, राहुल मकवाना, जयश्री नंदवाणी, सोनू जाधव, भाग्यश्री जाधव, योगेश निमसे, दुर्गा गुप्ता, रोहित कळमकर, कल्याणी पाटील, अविनाश बरबडे, श्रावणी निकम, शुभम पगार, प्रियांका पवार, वैभव बारहाते, पुण्याता जैन, संकेत निमसे, सिद्धी मेहरा, कुणाल सानप, महिमा जैन, अमोल भांड, माधुरी गांगुर्डे, महेश मंडाले, धनश्री देवरे, सार्वर्थ आसवा, सानिका भामरे, संदिप उफाडे, माधुरी शिंदे, मयुर मोकाट, ललित पिंगळे, अक्षय नेर, पूजा भवर, नेहा सैवाल, प्रज्योत दळवी, गायत्री सरकार, आकांक्ष वाघ, जय संकलेचा, पलक जैन, गौरव लोढा, समीक्षा पाटोळे, प्रशमेश आहिरे, आंचल पाटील, धुर्वी ठाकूर, पियुष असेरकर, पलक ओस्तवाल, पूर्वा लुणावत, गरिमा चोरडिया, हर्ष ओहरा, मनन किथारी, तीर्थेश कोठारी, मयूर छाजेड, पारस देवरे, रीत जैन, श्रेयांश गोरे, सन्मती वाखालकर, अनुजा सायकर, श्रावणी मैंद, सोहम आगळे, दिव्यम चौरे, जगदीश गुंजाळ, विदांत हिरे, विश्वास पाटील, साजन ढगे, अंकुश वाघमारे, अक्षय भालेराव, स्वप्निल सोनवणे, हर्षल जाधव, समीर गायकवाड, कौस्तुभ ठोकपती, पंकज दरोडे, पुष्कर शेवाळे, जय पाटील, यश पवार, आकाश वाघ, सार्थक आवारे आदींनी परिश्रम घेतले.

चौकट

सुमारे ३८०० गणेशमूर्तींचे संकलन

चोपडा लाँन्सजवळील गोदापार्क येथे ‘देव द्या, देवपण घ्या’ उपक्रमांतर्गत यंदा सुमारे ३८०० गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आल्याची माहिती संयोजक आकाश पगार यांनी दिली.

अभिनेता अभिजित खांडकेकर यांचा सहभाग

मराठी अभिनेता अभिजित खांडकेकर यांनी ‘देव द्या, देवपण घ्या’ उपक्रमात सहभागी होत आपल्या घरची गणेशमूर्ती कार्यकर्त्यांकडे सुपूर्द केली.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.