उच्च शिक्षण-तंत्रनिकेतन क्षेत्रातील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील तीन प्राध्यापकांचा समावेश

उच्च शिक्षण आणि तंत्रनिकेतन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी देशभरातील २१ शिक्षक-प्राध्यापकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ साठी निवड झाली आहे. महाराष्ट्रातील डॉ. विक्रम विशाल, डॉ. अमर ताकसांडे आणि डॉ. संदीपान नरोटे यांचा पुरस्कारार्थींमध्ये समावेश.

उच्च शिक्षण-तंत्रनिकेतन क्षेत्रातील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील तीन प्राध्यापकांचा समावेश
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र शिक्षक पुरस्कार, डॉ. विक्रम विशाल, डॉ. अमर ताकसांडे, डॉ. संदीपान नरोटे, IIT मुंबई, जेएनएमसी वर्धा, शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर, उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, शिक्षक दिन

प्रतिनिधी : नरेश शिंदे 

नवी दिल्ली, दि. २४ : देशभरातील उच्च शिक्षण आणि तंत्रनिकेतन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २१ शिक्षक-प्राध्यापकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ साठी निवड करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या पुरस्कारार्थींच्या यादीत महाराष्ट्रातील तीन प्राध्यापकांचा समावेश आहे.

शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

अध्यापनातील गुणवत्ता, नावीन्यपूर्ण उपक्रम, संशोधन तसेच शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत दोन टप्प्यांतील कठोर छाननी प्रक्रियेनंतर या शिक्षक-प्राध्यापकांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील तीन मानकरी

डॉ. विक्रम विशाल – आयआयटी, मुंबई

आयआयटी मुंबईच्या पृथ्वी विज्ञान विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. विक्रम विशाल हे ‘कॉम्प्युटेशनल अँड एक्सपेरिमेंटल जिओमेकॅनिक्स’ या संशोधन गटाचे नेतृत्व करतात.

जिओमेकॅनिक्स, कार्बन कॅप्चर अँड सिक्वेस्ट्रेशन तसेच अपारंपरिक हायड्रोकार्बन प्रणाली या क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेल्या उल्लेखनीय संशोधनाची दखल घेत त्यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

डॉ. अमर ताकसांडे – जेएनएमसी, वर्धा

दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. अमर मोहनराव ताकसांडे यांना बालरोगशास्त्रातील दीर्घकालीन अध्यापन, संशोधन आणि वैद्यकीय सेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

वैद्यकीय शिक्षणासोबतच रुग्णसेवा आणि संशोधनाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची पुरस्कारासाठी दखल घेण्यात आली आहे.

डॉ. संदीपान नरोटे – शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर

इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील संशोधनासाठी डॉ. संदीपान प्रल्हाद नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. विशेषतः इमेज प्रोसेसिंग आणि बायोमेट्रिक्स क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेण्यात आली.

शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सारखे आधुनिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचाही पुरस्कार निवड प्रक्रियेत विचार करण्यात आला आहे.

२१ शिक्षकांची अंतिम निवड

उच्च शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि तंत्रशिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक-प्राध्यापकांकडून प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करण्यात आली. दोन टप्प्यांतील निवड प्रक्रियेनंतर केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांमधील १२, राज्य विद्यापीठे व महाविद्यालयांमधील ५ आणि तंत्रनिकेतन संस्थांमधील ४, अशा एकूण २१ शिक्षक-प्राध्यापकांची अंतिम निवड करण्यात आली आहे.

अध्यापनातील उत्कृष्टता, संशोधनातील योगदान, नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी केलेल्या कार्याची दखल या निवड प्रक्रियेत घेण्यात आली.

महाराष्ट्रातील डॉ. विक्रम विशाल, डॉ. अमर ताकसांडे आणि डॉ. संदीपान नरोटे यांच्या निवडीमुळे राज्याच्या उच्च शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातील योगदानाला राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळाला आहे.