सांगवीतील नूतनीकरण केलेल्या भारतीय संविधान शिल्पाचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते लोकार्पण
संविधान दिनानिमित्त पिंपरी-चिंचवडमधील सांगवी येथे नूतनीकरण केलेल्या भारतीय संविधान शिल्पाचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते लोकार्पण. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचणार.
प्रतिनिधी: रोहन सोनाळे
ंविधान दिनानिमित्त विशेष सोहळा; स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचणार
पिंपरी, दि. २६ नोव्हेंबर : भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूलभूत मूल्यांचा गौरव करणाऱ्या सांगवी येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या भारतीय संविधान शिल्पाचे संविधान दिनाचे औचित्य साधून आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. संविधानाविषयी आदर, जागरूकता आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश देणारे हे शिल्प नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी यावेळी केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक ३२, सांगवी येथे भारतीय संविधान शिल्पाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. २६ नोव्हेंबर या संविधान दिनीच या नूतनीकृत शिल्पाचे लोकार्पण झाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण होते.
यावेळी बोलताना आमदार शंकर जगताप म्हणाले की, संविधान दिनाच्या दिवशी सांगवी येथील नूतनीकरण केलेल्या संविधान शिल्पाचे लोकार्पण होत आहे, ही आनंदाची बाब आहे. भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही महत्त्वपूर्ण मूल्ये दिली आहेत. या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे हे शिल्प नागरिकांना संविधानाचा आदर करण्याची आणि लोकशाही मूल्यांचे पालन करण्याची प्रेरणा देईल. संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन. यावेळी उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी एकत्रितपणे संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून लोकशाही मूल्यांचे जतन करण्याचा निर्धार व्यक्त केला.
‘आम्ही, भारताचे लोक’ या शब्दांनी सुरू होणाऱ्या संविधानाच्या प्रास्ताविकेत नमूद केलेली सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्याची संकल्पना तसेच सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या मूल्यांचा सामूहिक पुनरुच्चार करण्यात आला. संविधान प्रास्ताविकेचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
मान्यवरांची उपस्थिती
या लोकार्पण सोहळ्यास पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, ह प्रभाग अध्यक्षा तृप्ती कांबळे, नगरसदस्य हर्षल ढोरे, पल्लवी जगताप, उज्वला ढोरे, नगररचना विभागाचे उपसंचालक ललित खोब्रागडे, माजी नगरसदस्य संतोष कांबळे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी संतोष कोराड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संविधानाच्या विचारांचा जागर करण्याचा उपक्रम
सांगवी येथील संविधान शिल्पाच्या नूतनीकरणामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच भारतीय संविधानाचा गौरवशाली वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे. संविधानातील मूलभूत तत्त्वे केवळ पुस्तकांपुरती मर्यादित न राहता ती प्रत्येक नागरिकाच्या आचरणात उतरावीत, लोकशाहीविषयी आदर निर्माण व्हावा आणि सामाजिक एकोपा दृढ व्हावा, हा या उपक्रमामागील महत्त्वपूर्ण उद्देश आहे.
संविधान दिनाच्या निमित्ताने झालेल्या या लोकार्पण सोहळ्यामुळे सांगवी परिसरात भारतीय संविधानाच्या मूल्यांचा जागर करण्यात आला. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांवर आधारित समाजनिर्मितीसाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखावी, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.