प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सहा टप्प्यांत सुधारणा; १०० हून अधिक अनावश्यक सेवा रद्द
महाराष्ट्रात प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सहा टप्प्यांत सुधारणा राबविण्यात येत आहेत. आतापर्यंत १०० हून अधिक अनावश्यक सेवा रद्द, तर कागदपत्रांची आवश्यकता ५० टक्क्यांहून अधिक कमी करण्यात आली आहे.
प्रतिनिधी : देवानंद शिंदे
१०० हून अधिक अनावश्यक सेवा रद्द; कागदपत्रांची आवश्यकता ५० टक्क्यांहून अधिक कमी – मुख्य सचिव राजेश अग्रवाल
मुंबई : नागरिकांना शासकीय सेवा जलद, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून प्रशासकीय प्रक्रिया पुनर्रचनेवर भर देण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सहा महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये सुधारणा राबविण्यात येत असून, आतापर्यंत १०० हून अधिक अनावश्यक सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच विविध शासकीय सेवांसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची संख्या ५० टक्क्यांहून अधिक कमी करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिली.
या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट करताना नागरिकांना संविधानाने दिलेले अधिकार प्रत्यक्षात मिळण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ योग्य कार्यपद्धतीने, जलद आणि पारदर्शकपणे मिळणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. आरटीएस 2.0 अंतर्गत ७४ नागरी सेवांची भर, महाडीबीटीवरील योजनांच्या संख्येत वाढ आणि मैत्री प्लॅटफॉर्मवरील सेवांचा विस्तार ही नागरिकाभिमुख प्रशासनाच्या दिशेने महत्त्वाची पावले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सहा टप्प्यांत प्रशासकीय प्रक्रियेची पुनर्रचना
मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी प्रशासकीय प्रक्रिया पुनर्रचनेच्या कामाचा आढावा घेतला. नागरिकांना शासकीय कार्यालयांचे अनावश्यक फेरे मारावे लागू नयेत आणि सेवांचा लाभ कमीत कमी वेळेत मिळावा, या उद्देशाने प्रशासकीय प्रक्रियेतील अनावश्यक अडथळे दूर करण्यावर भर देण्यात येत आहे.
या सुधारणांमध्ये सहा प्रमुख बाबींचा समावेश आहे.
अनावश्यक आणि कालबाह्य शासकीय सेवा रद्द करणे.
उपलब्ध माहितीच्या आधारे प्रमाणपत्रे व कागदपत्रे स्वयंचलितपणे उपलब्ध करून देणे.
समान स्वरूपाच्या सेवांचे एकत्रीकरण करणे.
अर्जातील माहितीची क्षेत्रे आणि आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी करणे.
मंजुरीसाठी लागणारे प्रशासकीय टप्पे कमी करणे.
निर्णयप्रक्रियेतील अधिकारांचे विकेंद्रीकरण करून क्षेत्रीय अधिकाऱ्यांना अधिक अधिकार देणे.
या उपाययोजनांमुळे नागरिकांचा वेळ वाचण्यासोबतच प्रशासकीय कामकाज अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.
१०० हून अधिक अनावश्यक सेवा रद्द; कागदपत्रांची गरज कमी
प्रशासकीय प्रक्रिया पुनर्रचनेअंतर्गत आतापर्यंत शंभरहून अधिक अनावश्यक सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच विविध सेवांसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची आवश्यकता ५० टक्क्यांहून अधिक कमी करण्यात आली आहे.
बहुतांश विभागांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे निर्णय घेण्याचे अधिकार विकेंद्रित केले आहेत. त्यामुळे नागरिकांची कामे स्थानिक पातळीवरच जलदगतीने पूर्ण होण्यास मदत होऊ शकते. या अधिकारांचा योग्य आणि जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना केले.
महाआयटी, महासारथी आणि एपीआय सेतूवर भर
प्रशासकीय प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी तांत्रिक पायाभूत सुविधा सक्षम करण्यावरही शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. महाआयटीला सक्षम करणे, महासारथी प्रणालीचे बॅकएंड विकसित करणे आणि केंद्र शासनाच्या विविध डेटाबेसशी जोडणी करणारा एपीआय सेतू तयार करणे या बाबींवर सुरुवातीपासून भर देण्यात आला आहे.
सर्व विभागांचे सचिव आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतल्यामुळे प्रशासकीय सुधारणांच्या कामाला गती मिळाल्याचे मुख्य सचिवांनी सांगितले.
आरटीएस 2.0 आणि महाडीबीटीमुळे नागरिकांना दिलासा
आरटीएस 2.0 अंतर्गत ७४ नागरी सेवांची भर घालण्यात आली आहे. तसेच महाडीबीटी पोर्टलवरील योजनांची संख्या वाढविणे आणि मैत्री प्लॅटफॉर्मवरील सेवांचा विस्तार करणे या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.
संविधानाने नागरिकांना दिलेले अधिकार आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया सोपी, जलद आणि पारदर्शक असणे महत्त्वाचे आहे. या दिशेने सुरू असलेल्या सुधारणा नागरिकाभिमुख प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.