इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम २०२७ पर्यंत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे उर्वरित काम २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. एमएमआरडीएला दररोज कामाच्या प्रगतीवर नियंत्रण ठेवण्यास सांगितले.

इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम २०२७ पर्यंत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, इंदू मिल स्मारक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्मारकाचे काम २०२७,

प्रतिनिधी : नरेश शिंदे 

मुंबई, दि. २६ नोव्हेंबर २०२६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे उर्वरित काम वेगाने पूर्ण करून हे स्मारक २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराने सुधारित कालमर्यादा निश्चित करून त्यासंबंधीचा सविस्तर अहवाल उच्चाधिकार समितीकडे सादर करावा. तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) स्मारकाच्या कामाच्या प्रगतीवर दररोज नियंत्रण ठेवावे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली इंदू मिल स्मारकाच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीत प्रकल्पाची सद्यस्थिती, स्ट्रक्चरल स्टीलचे फॅब्रिकेशन, ब्रॉन्झ क्लॅडिंग, बांधकामाची गुणवत्ता, कंत्राटदाराकडून करण्यात आलेल्या अतिरिक्त आर्थिक मागण्या आणि काम पूर्ण करण्याची कालमर्यादा या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.

कामातील दिरंगाई खपवून घेणार नाही – मुख्यमंत्री

स्मारकाचे काम अपेक्षित वेगाने पूर्ण होत नसल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. कंत्राटातील अटी व शर्तींचे पालन करून काम पूर्ण करणे ही संबंधित कंत्राटदाराची जबाबदारी आहे. आर्थिक मागण्यांचे कारण देऊन काम थांबविणे योग्य नाही. कामातील दिरंगाई कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

संबंधित कंत्राटदार संस्थेची काम पूर्ण करण्याची क्षमता आणि प्रकल्पाप्रती असलेली बांधिलकी तपासण्यात यावी. आवश्यकतेनुसार पर्यायी एजन्सी नियुक्त करण्यासह कठोर कारवाईच्या पर्यायांचाही विचार करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

आर्थिक दाव्यांची तांत्रिक आणि कायदेशीर पडताळणी करा

कंत्राटदाराने केलेल्या अतिरिक्त आर्थिक मागण्यांबाबत घाईने निर्णय न घेता कंत्राटातील तरतुदी, जीएसटी दरातील बदल, दरवाढ निर्देशांक आणि अतिरिक्त कामांमुळे निर्माण झालेल्या खर्चाची तांत्रिक व आर्थिक पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले.

जीएसटी दरातील बदलाबाबत कंत्राटातील तरतुदींच्या अनुषंगाने कायदेशीर अभिप्राय घ्यावा. तसेच ब्रॉन्झ क्लॅडिंगसाठी आवश्यक साहित्य खरेदी करता यावे, यासाठी बँक हमीच्या आधारे आगाऊ रक्कम देण्याच्या प्रस्तावाची तपासणी करावी. सर्व आर्थिक प्रस्ताव एकत्रितपणे उच्चाधिकार समितीसमोर सादर करून नियमानुसार निर्णय घ्यावा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

स्ट्रक्चरल स्टील आणि ब्रॉन्झ क्लॅडिंगची कामे समांतरपणे पूर्ण करा

स्मारकाच्या बांधकामातील स्ट्रक्चरल स्टीलची उभारणी आणि ब्रॉन्झ क्लॅडिंगची कामे एकमेकांशी समन्वय साधून समांतरपणे पूर्ण करण्यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला.

आवश्यक साहित्य, यंत्रसामग्री, मनुष्यबळ, फॅब्रिकेशन आणि प्रत्यक्ष बांधकाम यांचा समावेश असलेले सुधारित वेळापत्रक तयार करून सादर करावे. प्रत्येक टप्प्याची जबाबदारी आणि काम पूर्ण करण्याची कालमर्यादा निश्चित करावी. त्यानुसार नियमित आढावा घेऊन कामाची गती वाढवावी, असे निर्देश देण्यात आले.

स्मारकाच्या संरचनात्मक रचनेची गुणवत्ता, सुरक्षितता आणि स्थैर्य याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. संबंधित एजन्सीची जबाबदारी कायम ठेवून काम वेगाने पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.

स्मारकाचे सामाजिक महत्त्व लक्षात घेऊन जबाबदारीने काम करा – मंत्री संजय शिरसाट

इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हा जनभावनेशी निगडित अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यामुळे या कामाकडे केवळ बांधकाम प्रकल्प म्हणून न पाहता त्यामागील सामाजिक महत्त्व लक्षात घेऊन सर्व संबंधितांनी जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

कंत्राटदाराने काम पूर्ण करण्याची मुदत निश्चित करतानाच आवश्यक नियोजन आणि संभाव्य जोखमींचा विचार करणे अपेक्षित होते. कोणतेही कारण देऊन दहा महिने काम थांबविणे योग्य नाही. कंत्राटातील अटी व शर्तींचे पालन करून काम पूर्ण करण्याची जबाबदारी कंत्राटदाराचीच आहे, असे मंत्री शिरसाट यांनी स्पष्ट केले.

शासनाकडून कंत्राटदाराच्या आर्थिक मागण्यांची नियमानुसार छाननी केली जाईल; मात्र या प्रक्रियेमुळे स्मारकाचे काम रखडता कामा नये. काम वेगाने पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराने ठोस नियोजन करून पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

बैठकीला वरिष्ठ अधिकारी आणि प्रकल्प सल्लागार उपस्थित

या आढावा बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार उपस्थित होते.

याशिवाय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, शापूरजी पालोनजी अँड कंपनी प्रा. लि. समूहाचे वरिष्ठ अधिकारी, शशी प्रभू अँड असोसिएट्सचे प्रकल्प सल्लागार आणि ज्येष्ठ शिल्पकार अनिल सुतार यांचीही उपस्थिती होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, सुधारित वेळापत्रक, दररोजचा प्रगती आढावा आणि कंत्राटदाराच्या कामगिरीवर नियंत्रण या माध्यमातून प्रकल्पाला गती देण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत.