केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन; आज महालक्ष्मी मंदिर विकासकामांचा शुभारंभ
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले असून ते कोल्हापूर-इचलकरंजीच्या एकदिवसीय दौऱ्यावर आले आहेत. श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर परिसरातील विकासकामांच्या शुभारंभासह विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.
कोल्हापूर प्रतिनिधी, दि. २० : भारताचे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांचे शुक्रवारी रात्री उशिरा कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. कोल्हापूर आणि इचलकरंजीच्या एकदिवसीय दौऱ्यासाठी ते शहरात दाखल झाले असून त्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृह येथे आहे.
कोल्हापूर विमानतळावर अमित शहा यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, विजय जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
अमित शहा यांच्या उपस्थितीत शनिवारी सकाळी ११ वाजता श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर परिसरातील विविध विकासकामांचा शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्रिमंडळातील अन्य सदस्य उपस्थित राहणार आहेत.
विकासकामांच्या शुभारंभानंतर अमित शहा पश्चिम महाराष्ट्र मंदिर विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांची पाहणी करणार आहेत. अनेक शतकांपासून भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या मूळ वैभवाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी विविध पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. तसेच मंदिराच्या जगप्रसिद्ध किरणोत्सवासाठी आवश्यक सुविधा विकसित करण्याचाही या आराखड्यात समावेश आहे. या प्रकल्पांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने भरीव निधीची तरतूद केली आहे.
मंदिर परिसराची पाहणी आणि विकास आराखड्यावरील चर्चेनंतर अमित शहा दुपारी सुमारे ११.३० वाजता पोलीस परेड ग्राउंड येथे आयोजित जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
दुपारच्या सत्रात ते इचलकरंजी येथे जनता सहकारी बँकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होतील. यानंतर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नामविस्तार सोहळ्यासही ते उपस्थित राहणार आहेत. पुढे सायंकाळी सुमारे ४.४५ वाजता कलाप्पाणा आवाडे टेक्स्टाईल पार्क मैदान, इचलकरंजी येथे आयोजित शेतकरी मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत.
दिवसभरातील विविध कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सायंकाळी सुमारे ७ वाजता कोल्हापूरहून मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
