लातूरकर रितेश-जेनेलिया बनले ‘लालपरी’चे चेहरे; मराठवाड्यात उत्साहाची लाट
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) ‘लालपरी’ बस सेवेसाठी अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची पुढील पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. मराठवाड्याशी घट्ट नाळ असलेल्या रितेश देशमुख यांच्या निवडीमुळे लातूरसह संपूर्ण मराठवाड्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मराठवाडा ब्युरो | लक्ष्मण चौरे
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) लोकप्रिय ‘लालपरी’ बस सेवेला आता ग्लॅमरचा नवा तडका मिळणार आहे. मराठवाड्याशी घट्ट नाळ असलेले अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची ‘फेसेस ऑफ MSRTC’ या मोहिमेअंतर्गत पुढील पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
एप्रिल 2026 मध्ये या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे रितेश देशमुख हे लातूर जिल्ह्याचे सुपुत्र असल्याने लातूरसह संपूर्ण मराठवाड्यात या निर्णयाचे उत्साहाने स्वागत करण्यात आले आहे. सोशल मीडियावरही नागरिकांनी आनंद व्यक्त करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी ‘लालपरी’ ही आजही जीवनरेखा मानली जाते. अनेक गाव-खेड्यांतील विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांना शहरांशी जोडण्याचे मोठे कार्य एसटी बस करत आली आहे. कित्येक युवकांची स्वप्ने घेऊन लालपरी रोज शहराच्या दिशेने धावत असते. त्यामुळे एसटीला ग्रामीण महाराष्ट्रात विशेष भावनिक स्थान आहे.
या नव्या मोहिमेद्वारे एसटीच्या आधुनिक सुविधा, सुरक्षित प्रवास, डिजिटल सेवा आणि ‘ई-शिवाई’ बस सेवांचा प्रचार अधिक प्रभावीपणे करण्याचा उद्देश आहे. दुर्गम भागातही एसटी सेवा पोहोचत असल्याने मराठवाड्यातील प्रवाशांना याचा थेट फायदा होणार आहे.
MSRTC प्रशासनाच्या या निर्णयामुळे ‘लालपरी’ची प्रतिमा अधिक आधुनिक, आकर्षक आणि तरुण पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मराठवाड्यातील नागरिकांसाठी ही बातमी अभिमानाची ठरत आहे.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1