महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला 3,000 कोटींची मोठी चालना; अमित शहा यांची दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर आणि पुणे येथे प्रत्येकी 1,500 कोटी रुपयांच्या दोन महत्त्वाकांक्षी सहकारी प्रकल्पांची घोषणा केली. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सहकार, साखर उद्योग आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.

Jun 21, 2026 - 02:30
 0  6
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला 3,000 कोटींची मोठी चालना; अमित शहा यांची दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा
इचलकरंजी येथील जाहीर सभेत केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी उमेश जाधव,

कोल्हापूर दि. 20 : महाराष्ट्रातील सहकार आणि साखर उद्योगाला नवे बळ देणारी महत्त्वपूर्ण घोषणा करत केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी राज्यातील सहकार क्षेत्रासाठी तब्बल 3,000 कोटी रुपयांच्या दोन मोठ्या प्रकल्पांची घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1,500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प तसेच पुण्यातील बंद पडलेले नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

इचलकरंजी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे टेक्सटाईल पार्कमध्ये आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, खासदार धैर्यशील माने, धनंजय महाडिक तसेच विविध लोकप्रतिनिधी आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

साखर उद्योगाला नवसंजीवनी देणारे निर्णय

अमित शहा यांनी सांगितले की, सहकार मंत्रालयाच्या स्थापनेनंतर केंद्र सरकारने साखर उद्योगाला स्थैर्य आणि दीर्घकालीन विकास देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. साखर कारखान्यांवरील सुमारे 46 हजार कोटी रुपयांचा प्राप्तीकर माफ करण्यात आला असून राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळामार्फत (NCDC) 10 हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.

इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढविणे, मल्टीफीड इथेनॉल प्रकल्पांना प्रोत्साहन देणे आणि इथेनॉलवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करणे यामुळे साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच बंद पडलेल्या साखर कारखान्यांचे पुनरुज्जीवन आणि साखरेपलीकडे इथेनॉल, सीबीजी व इतर मूल्यवर्धित उत्पादनांकडे उद्योगाला वळविण्याचे धोरण राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्हापूरमध्ये 1,500 कोटींचा सहकारी प्रक्रिया प्रकल्प

काही सहकारी साखर कारखान्यांना स्वतंत्रपणे सायट्रिक ॲसिड, इथेनॉल किंवा सीबीजी प्रकल्प उभारणे शक्य नसल्याने सर्व कारखान्यांच्या उपउत्पादनांवर प्रक्रिया करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1,500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

या प्रकल्पात विविध साखर कारखान्यांच्या बाय-प्रॉडक्ट्सवर प्रक्रिया करून सायट्रिक ॲसिड, इथेनॉल, सीबीजी आणि इतर मूल्यवर्धित उत्पादने तयार केली जातील. या प्रकल्पातून होणारा नफा पुन्हा सहभागी सहकारी संस्थांना वितरित केला जाणार असल्याने शेतकरी, सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा लाभ मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर या प्रकल्पाला तातडीने मंजुरी देण्यात आल्याचे सांगत अमित शहा यांनी पुढील तीन महिन्यांत प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले.

पुण्यातील नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्हचे पुनरुज्जीवन

पुण्यातील बंद पडलेले ‘नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह’ पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकार 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पाद्वारे देशातील तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील साखर कारखान्यांसाठी आवश्यक यंत्रसामग्रीचे उत्पादन केले जाणार आहे.

याशिवाय डेअरी प्लांट, इथेनॉल प्लांट, सायट्रिक ॲसिड प्रकल्प आणि शेण अथवा मळीपासून सीबीजी निर्मितीसाठी आवश्यक उपकरणांची निर्मितीही या केंद्रात केली जाणार आहे. या प्रकल्पाचा आर्थिक लाभ सहकारी क्षेत्राला थेट मिळणार असल्याचे अमित शहा यांनी सांगितले.

इचलकरंजीसाठी पाणी आणि ऊर्जा प्रकल्पांची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजी शहरासाठी 2051 पर्यंतच्या गरजा लक्षात घेऊन शिरोळ तालुक्यातील जुने दानवाड येथून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल आणि त्यासाठी आवश्यक निधी राज्य सरकार उपलब्ध करून देईल, अशी घोषणा केली.

तसेच पॉवरलूम उद्योगासाठी सोलर पार्क उभारून स्वस्त आणि स्वच्छ वीज उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. इचलकरंजीच्या सहकार आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील ऐतिहासिक योगदानाचा गौरव करत कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.

सहकार चळवळीला नवे बळ – एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इचलकरंजी हे सहकारातून समृद्धी निर्माण करणारे आदर्श मॉडेल असल्याचे सांगितले. सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून शहरी सहकारी बँकांसाठी नवी धोरणे, आधार-सक्षम पेमेंट प्रणाली, गोल्ड लोन, वाढीव कर्जमर्यादा, वन-टाइम सेटलमेंट योजना आणि अम्ब्रेला ऑर्गनायझेशनसारख्या उपक्रमांमुळे सहकार क्षेत्र अधिक मजबूत झाल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन तसेच कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नामविस्ताराची घोषणा करण्यात आली. मोठ्या संख्येने नागरिक, शेतकरी, सभासद आणि सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1