विश्वाशी जोडणारी जीवनपद्धती म्हणजे योग : निवासी आयुक्त श्वेता सिंघल; महाराष्ट्र सदनात उत्साहात साजरा १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. "निरोगी वार्धक्यासाठी योग" या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव श्वेता सिंघल यांनी योग ही मन, शरीर आणि आत्म्याला विश्वाशी जोडणारी जीवनपद्धती असल्याचे सांगितले. आयुष मंत्रालय, महाराष्ट्र सदन आणि दिल्ली मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान सत्रांचे आयोजन करण्यात आले.
नवी दिल्ली प्रतिनिधी नरेश शिंदे, दि. २१ जून : योग हा केवळ शरीर तंदुरुस्त ठेवण्याचा व्यायाम नसून मन, शरीर आणि आत्म्याला ब्रह्मांडाच्या नैसर्गिक लयीशी जोडणारी जीवनपद्धती आहे. योग म्हणजे आपल्या अस्तित्वाला विश्वाशी जोडणारे प्रभावी माध्यम असून तो निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवनाचा आधार आहे, असे प्रतिपादन निवासी आयुक्त तथा सचिव श्वेता सिंघल यांनी केले.
नवीन महाराष्ट्र सदन येथे महाराष्ट्र सदन, दिल्ली मराठी प्रतिष्ठान आणि आयुष मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची "निरोगी वार्धक्यासाठी योग" ही जागतिक संकल्पना केंद्रस्थानी ठेवून विशेष योगाभ्यास सत्राचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक वैभव डांगे, सहाय्यक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, महाराष्ट्र सदनचे व्यवस्थापक प्रमोद कोलापत्ते, उपनिवास अभियंता जमुनाप्रसाद गंगवार तसेच दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेचे योग प्रशिक्षक आदित्य देव यांनी योगाचे वैज्ञानिक महत्त्व, आरोग्यदायी फायदे आणि दैनंदिन जीवनातील उपयुक्तता याविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शक अमर यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली.
सुमारे तासभर चाललेल्या योगसत्रात ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, भद्रासन, वज्रासन, शशांकासन, भुजंगासन, पवनमुक्तासन, शवासन यांसह विविध योगासनांचा सराव करण्यात आला. तसेच कपालभाती, नाडीशोधन, अनुलोम-विलोम आणि भ्रामरी प्राणायामासह ध्यान प्रक्रियेचाही सहभागींनी अनुभव घेतला.
समारोप प्रसंगी "ॐ सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः" या विश्वकल्याणाच्या मंगल प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली. उपस्थितांनी नियमित योगाभ्यासाचा संकल्प करत निरोगी जीवनशैलीचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. योग ही वैयक्तिक आरोग्य, मानसिक संतुलन आणि सामाजिक सशक्तीकरणासाठी काळाची गरज असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0