एसटी उपहारगृहात मंत्र्यांची साधी-सरळ भेट; प्रवाशांसोबत वडापाव आणि कॉफीचा आस्वाद
संगमेश्वर बसस्थानकाच्या पाहणीदरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांसोबत बसून एसटी उपहारगृहातील वडापाव आणि कॉफीचा आस्वाद घेतला. त्यांच्या या साधेपणाने प्रवाशांची मने जिंकली असून एसटीच्या सुधारित सुविधांबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.
रायगड प्रतिनिधी: दिपक शिंदे
संगमेश्वर : राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी संगमेश्वर बसस्थानकाला दिलेल्या भेटीदरम्यान आपल्या साधेपणाने प्रवाशांची मने जिंकली. कोकण दौऱ्यावर असताना त्यांनी बसस्थानकाची पाहणी केली आणि त्यानंतर एसटीच्या उपहारगृहात प्रवाशांसोबत बसून गरमागरम वडापाव आणि कॉफीचा आस्वाद घेत सर्वांनाच सुखद धक्का दिला.
शुक्रवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास मंत्री सरनाईक यांनी संगमेश्वर येथील नव्याने उभारलेल्या आधुनिक बसस्थानकाला भेट दिली. यावेळी त्यांनी बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. तसेच उपलब्ध सुविधा, स्वच्छता आणि व्यवस्थेबाबतही त्यांनी प्रत्यक्ष चौकशी केली.
पाहणीदरम्यान त्यांनी बसस्थानकातील प्रसाधनगृहे, हिरकणी कक्ष आणि इतर प्रवासी सुविधांची तपासणी केली. बसस्थानकातील स्वच्छता आणि नीटनेटकेपणाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यानंतर त्यांची पावले बसस्थानकातील एसटी उपहारगृहाकडे वळली.
उपहारगृहात त्या वेळी अनेक प्रवासी वडापाव, भजी, चहा आणि कॉफीचा आनंद घेत होते. याच वातावरणात मंत्री सरनाईक यांनी कोणताही बडेजाव न करता थेट प्रवाशांमध्ये बसून वडापाव आणि कॉफीचा आस्वाद घेतला. त्यांच्या या साध्या आणि आपुलकीच्या वागणुकीमुळे उपस्थित प्रवासी भारावून गेले.
राज्याचे परिवहन मंत्री आपल्या शेजारी बसून गप्पा मारत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आहेत, हे दृश्य अनेकांसाठी अविस्मरणीय ठरले. प्रवाशांनीही या अनपेक्षित भेटीचे स्वागत करत आनंद व्यक्त केला.
संगमेश्वर बसस्थानकातील हा प्रसंग केवळ पाहणीपुरता मर्यादित न राहता एसटीच्या बदलत्या चेहऱ्याचे आणि प्रवाशांशी जपल्या जाणाऱ्या आत्मीय नात्याचे प्रतीक ठरला. स्वच्छता, दर्जेदार सुविधा आणि प्रवाशांप्रती असलेली बांधिलकी यांचा सकारात्मक संदेश या भेटीतून देण्यात आला.
लालपरीच्या सेवेत होत असलेल्या बदलांचा प्रत्यक्ष अनुभव देणारी ही भेट प्रवाशांसाठी संस्मरणीय ठरली असून एसटी सेवांबाबतचा विश्वास अधिक दृढ करणारी ठरली आहे.