राजावाडी रुग्णालय पुनर्विकासाला वेग – पुढील आठवड्यात बांधकाम सुरू करण्याचे महापौर रितू तावडे यांचे आदेश

घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयाच्या पुनर्विकासाला गती देत महापौर रितू तावडे यांनी पहिल्या टप्प्यातील इमारत बांधकाम पुढील आठवड्यात सुरू करण्याचे निर्देश दिले. ६०० खाटांची आधुनिक इमारत उभारण्याचा प्रकल्प.

Apr 2, 2026 - 00:51
Apr 3, 2026 - 06:58
 0  20
राजावाडी रुग्णालय पुनर्विकासाला वेग – पुढील आठवड्यात बांधकाम सुरू करण्याचे महापौर रितू तावडे यांचे आदेश

राजावाडी रुग्णालय पुनर्विकासाला गती – पुढील आठवड्यात प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे महापौर रितू तावडे यांचे निर्देश

घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयावर वाढत्या रुग्णसंख्येमुळे मोठा ताण येत असून, अशा परिस्थितीत रुग्णालयाच्या पुनर्विकासाचे काम रखडणे कोणत्याही परिस्थितीत परवडणारे नाही, असे स्पष्ट करत मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यातील इमारत उभारणीचे प्रत्यक्ष काम पुढील आठवड्यात सुरू करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. प्रलंबित परवानग्या तातडीने मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

घाटकोपर (पूर्व) येथील सेठ व्ही. सी. गांधी आणि एम. ए. व्होरा महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, म्हणजेच राजावाडी रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा प्रकल्प सध्या सुरू असून, पहिल्या टप्प्यात सुमारे ६०० रुग्णशय्यांची आधुनिक सुविधा असलेली नवी इमारत उभारली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महापौर रितू तावडे यांनी २ एप्रिल २०२६ रोजी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी भेट देऊन पाहणी केली.

या पाहणीदरम्यान नगरसेवक धर्मेश गिरी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारती राजूलवाला, उपप्रमुख अभियंता मनोज राणे, सहायक आयुक्त मारुती पवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

प्रकल्पाबाबत माहिती देताना उपप्रमुख अभियंता मनोज राणे यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणारी इमारत ही निम्न तळघर, तळघर, तळमजला आणि त्यावर १० मजले अशा स्वरूपाची असेल. या इमारतीमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतील आणि एकूण बांधकाम क्षेत्रफळ सुमारे ३३,१७९ चौरस मीटर असेल. डिसेंबर २०२५ मध्ये भूमिपूजन झाले असून, आवश्यक परवानग्या मिळताच काम सुरू करण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण रुग्णालय नवीन इमारतीत स्थलांतरित केले जाईल आणि त्यानंतर पुढील टप्प्यात दुसऱ्या इमारतीचे काम सुरू केले जाईल.

दरम्यान, भूमिपूजन होऊन चार महिने उलटूनही प्रत्यक्ष काम सुरू न झाल्याबद्दल महापौरांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने अडचणी लपवून न ठेवता वरिष्ठांच्या निदर्शनास आणाव्यात आणि लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेऊन त्या सोडवाव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले. सर्व आवश्यक परवानग्या मिळवण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असून, कामात होणारा विलंब सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

याशिवाय, बांधकाम सुरू असताना शेजारील रुग्णालयातील रुग्णांना आवाज किंवा धुळीचा त्रास होऊ नये यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच कामाच्या प्रत्येक टप्प्यावर स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेऊन माहिती देण्यास सांगितले. पुनर्विकास प्रकल्पाबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सविस्तर सादरीकरण करण्याच्या सूचनाही महापौरांनी दिल्या.

What's Your Reaction?

Like Like 8
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0