मुंबईत ‘वृक्ष संजीवनी’ अभियानाची सुरुवात; ३० एप्रिलपर्यंत संपूर्ण शहरात उपक्रम

बृहन्मुंबई महानगरपालिका तर्फे ‘वृक्ष संजीवनी’ अभियानाची सुरुवात उपमहापौर संजय घाडी यांच्या हस्ते झाली. १ ते ३० एप्रिल दरम्यान संपूर्ण मुंबईत झाडांच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

Apr 3, 2026 - 23:26
 0  13
मुंबईत ‘वृक्ष संजीवनी’ अभियानाची सुरुवात; ३० एप्रिलपर्यंत संपूर्ण शहरात उपक्रम
उपमहापौर संजय घाडी

बृहन्मुंबई महानगरपालिका तर्फे आयोजित ‘वृक्ष संजीवनी’ अभियानाचा शुभारंभ आज दहिसर येथील अशोकवन येथे करण्यात आला. उपमहापौर संजय घाडी यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात झाली असून, १ ते ३० एप्रिल २०२६ दरम्यान संपूर्ण मुंबईत हे अभियान राबवले जाणार आहे.

जागतिक वसुंधरा दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या अभियानाचा उद्देश शहरातील झाडांचे संरक्षण आणि संवर्धन करणे हा आहे. याअंतर्गत झाडांच्या भोवती साचलेले सिमेंट आणि काँक्रिट काढून त्याजागी मोकळी माती टाकणे, झाडांवर ठोकलेले खिळे, जाहिरातींचे फलक, दोऱ्या आणि केबल्स हटवणे यांसारख्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या फांद्यांची छाटणी आणि झाडांच्या खोडांना गेरू-चुना लावून संरक्षण करण्याचे कामही केले जाणार आहे.

या कार्यक्रमाला शिवसेना उपनेत्या संजना घाडी, ‘आर उत्तर’ विभागाचे सहायक उद्यान अधीक्षक निलेश धनावडे, माजी कसोटीपटू सुरेश नायक यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

यावेळी दहिसर येथील मुंबई पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धनाबाबत जनजागृतीपर गीत सादर केले. तसेच पोस्टर्सच्या माध्यमातून नागरिकांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

महानगरपालिकेने मुंबईकरांना या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून शहरातील हरित संपदा जपण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. 

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0