मुंबईच्या शाश्वत विकासासाठी भूजल व्यवस्थापन आवश्यक – तज्ज्ञांचे मत

मुंबईतील कार्यशाळेत तज्ज्ञांनी भूजल व्यवस्थापन आणि नियोजन शाश्वत विकासासाठी अत्यावश्यक असल्याचे सांगितले; NAQUIM निष्कर्षांवर चर्चा.

Apr 4, 2026 - 02:55
Apr 5, 2026 - 03:26
 0  4
मुंबईच्या शाश्वत विकासासाठी भूजल व्यवस्थापन आवश्यक – तज्ज्ञांचे मत
BMC officer Photo

मुंबईच्या शाश्वत विकासासाठी भूजल व्यवस्थापन आणि नियोजन अत्यंत आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ‘केंद्रीय भूजल विभागाचे भूजल माहिती भंडार तसेच जलधर नकाशाकरण अभ्यास प्रकल्पांचे उपयोग’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या कार्यशाळेत केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या अधिनस्त केंद्रीय भूजल मंडळाचे वरिष्ठ भूजल वैज्ञानिक उपेंद्र धोंडे यांनी भूजल व्यवस्थापनाविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. भूजलाची अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्याचा प्रभावी वापर कसा करावा, यावर त्यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले.

कार्यशाळा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी आणि डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी पर्यावरण, जल अभियांत्रिकी, नियोजन विभाग तसेच विविध सरकारी आणि खासगी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले. एकूण ३१ प्रतिनिधी प्रत्यक्ष आणि २५ प्रतिनिधी ऑनलाइन उपस्थित होते.

उपेंद्र धोंडे यांनी राष्ट्रीय जलभांडार नकाशांकन व व्यवस्थापन कार्यक्रम (NAQUIM) अंतर्गत निष्कर्ष मांडताना देशातील भूजल साठ्यांचे स्थान, प्रमाण आणि त्याचा योग्य वापर याबाबत सविस्तर माहिती दिली. मुंबईसारख्या किनारपट्टी भागात भूजलातील खारटपणा वाढण्याचा धोका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच भूगर्भातील पाण्याचा वाढता उपसा नियंत्रणात ठेवणे आणि प्रदूषण कमी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या बैठकीत अटल भूजल योजना, जलशक्ती अभियान, जलसंचय जनभागीदारी आणि मिशन अमृत सरोवर यांसारख्या योजनांची माहिती देण्यात आली. भूजल माहिती प्रसारणामुळे स्थानिक पातळीवर नियोजन आणि निर्णय प्रक्रियेला गती मिळते, यावरही भर देण्यात आला.

यावेळी ‘कृत्रिम पुनर्भरण संरचनांच्या यशोगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. उप आयुक्त अविनाश काटे यांनी केंद्रीय भूजल मंडळाच्या प्रयत्नांचे कौतुक केले. तर डॉ. सूर्यवंशी यांनी प्रभावी भूजल नियमनासाठी कायदे सुलभ करण्याची गरज व्यक्त केली.

कार्यशाळेत भूजल नियमन, जललेखा परीक्षण आणि किनारपट्टीवरील जलधर प्रदूषण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैज्ञानिक संदीप वाघमारे यांनी केले.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0