'शासन आपल्या दारी' उपक्रमाला मानाचा स्कॉच पुरस्कार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र शासनाच्या 'शासन आपल्या दारी' या लोकाभिमुख उपक्रमाला 2024 चा प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार प्राप्त झाला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज स्कॉच ग्रुपच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या उपक्रमाद्वारे राज्यातील पाच कोटींहून अधिक नागरिकांपर्यंत विविध शासकीय योजनांचे लाभ पोहोचवण्यात आले.

Jun 10, 2026 - 13:30
 0  5
'शासन आपल्या दारी' उपक्रमाला मानाचा स्कॉच पुरस्कार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुरस्कार प्रदान
एकनाथ शिंदे, शासन आपल्या दारी, स्कॉच पुरस्कार, SKOCH Award 2024,

मुंबई | प्रतिनिधी दीपक शिंदे 

महाराष्ट्र शासनाच्या लोकाभिमुख आणि जनकल्याणकारी 'शासन आपल्या दारी' या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला 2024 सालचा प्रतिष्ठेचा स्कॉच (SKOCH) पुरस्कार जाहीर झाला होता. मात्र, त्यावेळी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्ली येथे जाऊन हा पुरस्कार स्वीकारणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे आज स्कॉच ग्रुपच्या वतीने त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला. देशभरातील विविध श्रेणींतील सुमारे 280 प्रकल्पांमधून 'शासन आपल्या दारी' या उपक्रमाची निवड करण्यात आली होती.

शासनाच्या विविध योजना आणि कल्याणकारी कार्यक्रमांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. वर्षभर सातत्याने राबविण्यात आलेल्या या अभियानाद्वारे राज्यातील पाच कोटींहून अधिक नागरिकांपर्यंत विविध शासकीय योजनांचे लाभ पोहोचविण्यात यश मिळाल्याचेही शिंदे यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव नवीन सोना, स्कॉच ग्रुपचे अध्यक्ष समीर कोचर, उपाध्यक्ष डॉ. गुरुशरण धंजल तसेच व्यवस्थापकीय संचालक दीपक दलाल उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0