लालबाग-परळमधील शाळा व मनोरंजन मैदानासाठी आरक्षित भूखंडावरील बांधकामांचे निष्कासन; १२ वर्षांच्या प्रयत्नांना यश
बृहन्मुंबई महानगरपालिकेने मेघवाडी, लालबाग, परळ परिसरातील शाळा आणि मनोरंजन मैदानासाठी आरक्षित भूखंडावरील बांधकामांविरोधात धडक कारवाई करत चार बांधकामांचे निष्कासन केले. तब्बल १२ वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळाल्याने परिसरातील ५० हजारांहून अधिक नागरिकांसाठी मनोरंजन मैदान उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई | प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एफ (दक्षिण) विभागाने मेघवाडी, लालबाग, परळ आणि काळाचौकी परिसरातील शाळा व मनोरंजन मैदानासाठी आरक्षित भूखंडावरील बांधकामांविरोधात धडक कारवाई करत चार बांधकामांचे निष्कासन केले. या कारवाईमुळे मागील १२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भूखंड मुक्तीच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार, उपआयुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त (एफ दक्षिण विभाग) वृषाली इंगुले यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली.
५० हजार नागरिकांना मिळणार मैदानाचा लाभ
विकास नियोजन आराखडा-२०३४ नुसार मेघवाडी, लालबाग, परळ आणि काळाचौकी परिसरातील भूखंड क्रमांक १/११८, १ बी/११८, २/११८, ३/११८, ४/११८ आणि ७/११८ हे भूखंड मनोरंजन मैदान आणि महानगरपालिका शाळेसाठी आरक्षित आहेत. या भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ ७,८७२.१४ चौरस मीटर इतके आहे.
सदर जागेवरील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईमुळे परिसरातील सुमारे ५० हजारांहून अधिक नागरिकांना भविष्यात सार्वजनिक मनोरंजन मैदानाचा लाभ मिळणार आहे.
१३ पैकी ७ बांधकामांचे निष्कासन
आरक्षित भूखंडावरील सुमारे २७४ चौरस मीटर क्षेत्रात १३ भाडेकरू व बांधकामधारक वास्तव्यास होते. महानगरपालिकेच्या धोरणानुसार संबंधितांना पर्यायी सदनिका किंवा रेडी रेकनर दरानुसार आर्थिक मोबदला यापैकी पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता.
या प्रक्रियेनंतर एकूण १३ बांधकामांपैकी आतापर्यंत ७ बांधकामांचे निष्कासन करण्यात आले आहे. उर्वरित ६ बांधकामांवरही लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
१२ वर्षांपासून सुरू होते प्रयत्न
सदर भूखंड मोकळा करण्यासाठी गेल्या १२ वर्षांपासून विविध प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू होत्या. अखेर या कारवाईमुळे आरक्षित जागा मूळ उद्देशासाठी उपलब्ध करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
मोठा बंदोबस्त आणि यंत्रसामग्रीचा वापर
निष्कासन मोहिमेसाठी २ जेसीबी, १ डंपर, १ रुग्णवाहिका आणि इतर आवश्यक यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. कारवाईदरम्यान महानगरपालिकेचे ४५ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0