अॅसिडिटीचा भास; प्रत्यक्षात सर्पदंशाने युवतीचा मृत्यू, बुलढाण्यात हृदयद्रावक घटना

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात 19 वर्षीय युवतीचा सर्पदंशाने मृत्यू झाला. सुरुवातीला अॅसिडिटीचा त्रास वाटल्याने उपचारात उशीर झाल्याची धक्कादायक घटना समोर आली.

Apr 5, 2026 - 22:25
Apr 5, 2026 - 22:43
 0  5
अॅसिडिटीचा भास; प्रत्यक्षात सर्पदंशाने युवतीचा मृत्यू, बुलढाण्यात हृदयद्रावक घटना
19 वर्षीय युवतीचा सर्पदंशाने मृत्यू झाला

विदर्भ ब्युरो रिपोर्ट | अमोल सराफ

बुलढाणा : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आणि बदलत्या वातावरणामुळे साप बाहेर येण्याच्या घटना वाढल्या असून, याचाच बळी एका 19 वर्षीय युवतीला जावे लागल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथील कुमारी साक्षी रवींद्र सानप हिचा शुक्रवारी रात्री झोपेत असताना विषारी साप चावल्याने मृत्यू झाला. ही घटना 4 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, साक्षी ही आई-वडिलांसोबत झोपलेली असताना रात्री विषारी सापाने चावा घेतला. सकाळी उठल्यानंतर तिच्या घशात दुखत असल्याचे तसेच अॅसिडिटीसारखा त्रास होत असल्याची तक्रार तिने केली. यानंतर तात्काळ तिला लोणार येथील दवाखान्यात नेण्यात आले.

लोणार येथे उपचार सुरू असताना प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने आणि सर्पदंशाची लक्षणे दिसू लागल्याने तिला पुढील उपचारासाठी मेहकर येथे हलवण्यात येत होते. मात्र, रस्त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान, संबंधित साप शेजारच्या अंगणात आढळून आल्याची माहितीही समोर आली आहे. साक्षी ही सुलतानपूर येथील बी. फार्मसी द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती.

तिच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. वैद्यकीय तपासणीनंतर शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात आई-वडील, भाऊ-बहिण, आजी-आजोबा व इतर नातेवाईक असा मोठा परिवार आहे.

अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या वातावरणामुळे साप घराजवळ येण्याच्या घटना वाढत असून, नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0