‘राजा शिवाजी’मधून अभिषेक बच्चनचा मराठी डेब्यू; संभाजी महाराजांच्या भूमिकेत भव्य एंट्री
‘राजा शिवाजी’ चित्रपटातून अभिषेक बच्चन मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत असून, ते संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहेत. टीझरला प्रचंड प्रतिसाद.
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘राजा शिवाजी’ या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून, या चित्रपटातून अभिषेक बच्चन यांचा दमदार मराठी डेब्यू होत आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित या चित्रपटात अभिषेक बच्चन संभाजी शहाजी राजे भोसले यांच्या भूमिकेत झळकणार आहेत.
जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित हा चित्रपट केवळ भव्यतेसाठीच नव्हे, तर ऐतिहासिक आणि भावनिक आशयासाठीही विशेष मानला जात आहे. अभिषेक बच्चनसाठी हा पहिलाच मराठी चित्रपट असून त्यांच्या करिअरमधील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे.
नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’च्या फर्स्ट लूक टीझरमध्ये अभिषेक बच्चन यांचा एक वेगळाच आणि प्रभावी अवतार पाहायला मिळतो. योद्ध्याचा साज, रणांगणातील त्यांची दमदार उपस्थिती आणि बंधुप्रेमाचे भावनिक दर्शन यामुळे टीझरला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट केवळ युद्धावर आधारित नसून, नातेसंबंध, भावना आणि इतिहास यांचा भव्य संगम असणार असल्याचे या झलकमधून स्पष्ट होते.
आपल्या मराठी डेब्यूबद्दल बोलताना अभिषेक बच्चन यांनी सांगितले की, हा प्रकल्प त्यांच्या आयुष्यातील एक खास अनुभव आहे. त्यांनी रितेश देशमुख यांच्यासोबतच्या २५ वर्षांच्या मैत्रीचा उल्लेख करत, या चित्रपटामागील त्यांचे स्वप्न आणि मेहनत अधोरेखित केली.
चित्रपटाचा फर्स्ट लूक टीझर ३१ मार्च रोजी प्रदर्शित झाला असून, सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा आहे. भव्य दृश्यरचना, दमदार ॲक्शन आणि ऐतिहासिक वातावरणामुळे प्रेक्षकांनी या टीझरचे “रोमांचक” आणि “भव्य सिनेअनुभव” असे वर्णन केले आहे.
या चित्रपटाचे आणखी एक आकर्षण म्हणजे अजय–अतुल यांचे संगीत आणि संतोष सिवन
यांचे अप्रतिम छायांकन. प्रत्येक फ्रेममध्ये भव्यता आणि वास्तवतेची जाणीव होते.
‘राजा शिवाजी’मध्ये संजय दत्त, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री,फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलिया देशमुख यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित हा चित्रपट १ मे २०२६ रोजी मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये जगभर प्रदर्शित होणार आहे. भारतीय इतिहासाचा गौरवशाली वारसा नव्या पिढीसमोर भव्यतेने मांडणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.
What's Your Reaction?
Like
5
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0