नागराज मंजुळे दिग्दर्शित 'खाशाबा'चा दमदार टीझर प्रदर्शित; १ जानेवारी २०२७ रोजी जगभरात चित्रपट प्रदर्शित

जिओ स्टुडिओज आणि आटपाट प्रॉडक्शन्स प्रस्तुत नागराज मंजुळे दिग्दर्शित 'खाशाबा' चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. १९५२ हेलसिंकी ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित हा चित्रपट १ जानेवारी २०२७ रोजी जगभर प्रदर्शित होणार आहे.

Jul 2, 2026 - 18:16
 0  15
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'खाशाबा'चा दमदार टीझर प्रदर्शित; १ जानेवारी २०२७ रोजी जगभरात चित्रपट प्रदर्शित
खाशाबा, नागराज मंजुळे, खाशाबा जाधव, हेलसिंकी ऑलिम्पिक १९५२,

प्रतिनिधी : मिलिंद कारेकर | मुंबई | २ जुलै २०२६

जिओ स्टुडिओज आणि आटपाट प्रॉडक्शन्स यांच्या बहुप्रतिक्षित 'खाशाबा' या चित्रपटाचा दमदार टीझर गुरुवारी सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. याचबरोबर हा भव्य चित्रपट १ जानेवारी २०२७ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

'फॅन्ड्री' आणि 'सैराट'सारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेल्या चित्रपटांनंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे पुन्हा एकदा एका प्रेरणादायी आणि भव्य कथेसह प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीत वेगळा ठसा उमटवणाऱ्या जिओ स्टुडिओजची ही आणखी एक महत्त्वाकांक्षी निर्मिती मानली जात आहे.

चित्रपटगृहांमध्ये प्रथम प्रदर्शित करण्यात आलेल्या 'खाशाबा'च्या टीझरला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आता हा टीझर डिजिटल प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित करण्यात आला आहे. पारंपरिक कुस्तीच्या आखाड्यांचे भव्य चित्रण, दमदार दृश्यरचना, उत्कंठावर्धक वातावरण, संघर्षाची भावनिक तीव्रता आणि चित्रपटाचा सिनेमॅटिक आवाका या टीझरमधून प्रभावीपणे अनुभवायला मिळतो.

'खाशाबा' हा चित्रपट स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र, दिग्गज कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकत भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा इतिहास घडवला. त्यांच्या संघर्ष, जिद्द आणि यशाचा प्रवास मोठ्या पडद्यावर भव्य स्वरूपात साकारण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

चित्रपटाच्या संगीताची धुरा संगीतविश्वातील लोकप्रिय जोडी अजय-अतुल यांनी सांभाळली आहे. विशेष म्हणजे, खाशाबा यांच्या प्रमुख भूमिकेसाठी एका नव्या चेहऱ्याची निवड करण्यात आली असून त्या कलाकाराची घोषणा लवकरच केली जाणार आहे.

या चित्रपटात जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर, गिरीश कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, वैभव मांगले, छाया कदम आणि गार्गी कुलकर्णी यांसारख्या दमदार कलाकारांच्या भूमिका आहेत.

जिओ स्टुडिओज आणि आटपाट प्रॉडक्शन्स प्रस्तुत 'खाशाबा' या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि गार्गी कुलकर्णी यांनी केली असून दिग्दर्शनाची धुरा नागराज मंजुळे यांनी सांभाळली आहे. टीझरनंतर या चित्रपटाबाबतची प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली असून, १ जानेवारी २०२७ रोजी हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1