महाराष्ट्र सदनात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘जिप्सी’ चित्रपटाचा विशेष खेळ; प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'जिप्सी' मराठी चित्रपटाचा विशेष खेळ आयोजित करण्यात आला. महाराष्ट्र सदनाला सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित करण्याचा संकल्प निवासी आयुक्त श्वेता सिंघल यांनी व्यक्त केला.

Jul 16, 2026 - 01:10
 0  4
महाराष्ट्र सदनात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘जिप्सी’ चित्रपटाचा विशेष खेळ; प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जिप्सी चित्रपट, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली, श्वेता सिंघल

नवी दिल्ली | प्रतिनिधी नरेश शिंदे 

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘जिप्सी’ मराठी चित्रपटाचा विशेष खेळ आयोजित करण्यात आला. जागरण फिल्म फेस्टिव्हल अंतर्गत झालेल्या या विशेष प्रदर्शनाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाच्या नवी दिल्लीतील विशेष निवासी आयुक्त श्वेता सिंघल प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात दैनिक जागरण समूहाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार, दैनिक जागरण समूहाच्या प्राची पंडित, आयना कपूर आणि सऊद अहमद यांच्यासह अनेक मान्यवर आणि चित्रपटप्रेमी उपस्थित होते.

महाराष्ट्र सदनाला सांस्कृतिक केंद्र बनविण्याचा संकल्प

यावेळी बोलताना श्वेता सिंघल म्हणाल्या की, महाराष्ट्र सदन हे केवळ शासकीय विश्रामगृह न राहता महाराष्ट्राच्या कला, संस्कृती आणि साहित्याचा प्रसार करणारे प्रमुख सांस्कृतिक केंद्र (कल्चरल हब) म्हणून विकसित करण्याचा शासनाचा संकल्प आहे. येथे आयोजित होणाऱ्या विविध सांस्कृतिक उपक्रमांमध्ये दिल्लीतील मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

मराठी रंगभूमी आणि मराठी चित्रपटसृष्टीचा समृद्ध कलाविष्कार देशभरातील रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची महत्त्वाची भूमिका असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘जिप्सी’

‘जिप्सी’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक शशी खंडारे यांना पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. चित्रपटात कबीर खंडारे यांनी ‘ज्योतीया’ या मुलाची मुख्य भूमिका साकारली असून त्यांच्या अभिनयाचेही मोठे कौतुक झाले आहे.

१४ शहरांमध्ये जागरण फिल्म फेस्टिव्हल

जागरण फिल्म फेस्टिव्हल हा दैनिक जागरण समूहाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असून तो देशातील ८ राज्ये आणि १४ शहरांमध्ये आयोजित करण्यात येत आहे. या माध्यमातून दर्जेदार भारतीय चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

महाराष्ट्र सदनात झालेल्या या विशेष चित्रपट प्रदर्शनामुळे राजधानी दिल्लीत मराठी चित्रपट आणि संस्कृतीचा प्रचार-प्रसार करण्याच्या उपक्रमाला नवी चालना मिळाल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0