राजा शिवाजी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; हिंदवी स्वराज्याच्या गाथेची भव्य झलक
‘जिओ स्टुडिओज’ आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ निर्मित ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा भव्य ट्रेलर मुंबईत प्रदर्शित करण्यात आला असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाची झलक यात पाहायला मिळते.
मुंबई/प्रतिनिधी –उदय कासारे
‘जिओ स्टुडिओज’ आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात आलेल्या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’चा भव्य ट्रेलर लाँच सोहळा मुंबईत पार पडला. निर्मात्यांनी हा ट्रेलर मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला असून प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
अभिनेता-दिग्दर्शक रितेश विलासराव देशमुख यांनी या चित्रपटात दिग्दर्शन, अभिनय, लेखन आणि निर्मिती अशा सर्व महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून ते ‘राजा शिवाजी’ होण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास या चित्रपटातून उलगडण्यात आला आहे. ‘हिंदवी स्वराज्य’ या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवत चित्रपटात काही महत्त्वाचे आणि कमी परिचित ऐतिहासिक पैलू नव्या दृष्टिकोनातून मांडण्यात आले आहेत.
या ट्रेलर लाँच कार्यक्रमाला जिओ स्टुडिओजच्या अध्यक्षा ज्योती देशपांडे, रितेश देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, भाग्यश्री, जितेंद्र जोशी, जिनिलीया देशमुख तसेच संगीतकार जोडी अजय-अतुल उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली.
रितेश देशमुख यांनी सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट साकार करणे हे माझ्यासाठी एक स्वप्न होते. गेल्या दहा वर्षांपासून या प्रकल्पावर काम सुरू होते. हा चित्रपट आम्ही महाराजांना अर्पण म्हणून सादर करत आहोत.”
जिओ स्टुडिओजच्या अध्यक्षा ज्योती देशपांडे यांनीही या चित्रपटाला भारताच्या इतिहासाची आणि अस्मितेची भव्य अभिव्यक्ती असल्याचे सांगितले. तर निर्माती जिनिलीया देशमुख यांनी चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेदरम्यान संपूर्ण टीमने दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
‘राजा शिवाजी’ हा चित्रपट भव्यता, नेत्रदीपक दृश्यरचना, दमदार ॲक्शन आणि उच्च दर्जाच्या तांत्रिक मांडणीमुळे आधीपासूनच चर्चेत आहे. या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलीया देशमुख आणि रितेश देशमुख यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.
‘जिओ स्टुडिओज प्रस्तुत’ आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ निर्मित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि प्रेरणादायी जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची प्रेक्षकांची उत्सुकता या ट्रेलरमुळे अधिकच वाढली आहे.
What's Your Reaction?
Like
5
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
