मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण

भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, शहीद सैनिकांचे कुटुंबीय आणि नागरिक उपस्थित होते.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण
ॲड. आशिष शेलार, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, ध्वजारोहण, ८०वा स्वातंत्र्यदिन, स्वातंत्र्यदिन २०२६,

प्रतिनिधी: नरेश शिंदे 

मुंबई, दि. १५ ऑगस्ट २०२६ : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आज देशभक्तीमय वातावरणात ध्वजारोहण सोहळा पार पडला. सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

या प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, आमदार झीशान सिद्दीकी, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस उपायुक्त निमित गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल, उपजिल्हाधिकारी सुभाष काकडे यांच्यासह विविध शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तसेच स्वातंत्र्यसैनिक, शहीद सैनिकांचे कुटुंबीय, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला अभिवादन करत देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव उत्साहात साजरा केला.

तहसीलदार युवराज बांगर यांचा विशेष सत्कार

यावेळी पालकमंत्री ॲड. आशिष शेलार आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते तहसीलदार युवराज बांगर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेत ९० किलोमीटर अंतराची ‘द अल्टिमेट ह्युमन रेस’ म्हणून ओळखली जाणारी खडतर मॅरेथॉन स्पर्धा त्यांनी सलग दुसऱ्या वर्षी यशस्वीपणे पूर्ण केली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

यासोबतच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गुणवंत कर्मचाऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

विकसित भारत २०४७ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन

ध्वजारोहणानंतर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्वातंत्र्यसैनिक, शहीद सैनिकांचे कुटुंबीय, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पात प्रत्येक नागरिकाने सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन ॲड. आशिष शेलार यांनी यावेळी केले.

स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण, शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान आणि गुणवंतांचा गौरव अशा विविध उपक्रमांमुळे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वातंत्र्यदिन सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.