भावली धरण पर्यटक हल्ला प्रकरणी आणखी तीन प्रमुख आरोपी जेरबंद; नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई
इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेल्या हल्ला, लुटमार आणि महिलेच्या विनयभंग प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसांनी आणखी तीन प्रमुख फरार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईनंतर या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या १२ झाली असून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे.
नाशिक ब्युरो | नाशिक
इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेल्या हल्ला, लुटमार आणि महिलेच्या विनयभंग प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसांनी आणखी तीन प्रमुख फरार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईची माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भावली धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबावर हल्ला करून लुटमार करण्यात आली होती. तसेच पर्यटक महिलेशी विनयभंग झाल्याचा आरोप असून, या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान इगतपुरी पोलिसांनी यापूर्वी नऊ आरोपींना अटक केली होती. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र काही आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होते.
फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि इगतपुरी पोलीस संयुक्तपणे तपास करत होते. गुप्त माहितीच्या आधारे फरार आरोपी मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंडेगाव शिवारात मोटारसायकलवरून येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
राहुल बोरू भागडे (वय २६), रा. नांदगाव सदो, ता. इगतपुरी
आकाश चंद्रकांत भोईर (वय २७), रा. नांदगाव, ता. इगतपुरी
अशोक भागडे (वय २८), रा. नांदगाव, ता. इगतपुरी
पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली हिरो पॅशन मोटारसायकल जप्त केली आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, राहुल भागडे आणि आकाश भोईर हे नाशिक ग्रामीण पोलिसांच्या नोंदीतील सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर यापूर्वी इगतपुरी आणि घोटी पोलीस ठाण्यांत खुनासह गंभीर गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींची भावली धरण परिसरात धिंड काढून पोलिसांनी गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या कारवाईमुळे परिसरातील नागरिक आणि पर्यटकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, उर्वरित तपास इगतपुरी पोलीस करत आहेत.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0