राहुल गांधींच्या विरोधात नाशिकमध्ये भाजपचे जोरदार आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहतूक कोंडी

राहुल गांधी यांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कथित भूमिकेचा निषेध करत भाजपने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. महिलांचा मोठा सहभाग असून घोषणाबाजीमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गर्दी आणि वाहतूक कोंडी झाली.

राहुल गांधींच्या विरोधात नाशिकमध्ये भाजपचे जोरदार आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहतूक कोंडी
नाशिक भाजप आंदोलन, राहुल गांधी, राहुल गांधी नाशिक, भाजप निषेध आंदोलन,

काळे कपडे परिधान करून भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन; महिलांचा मोठा सहभाग, राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

नाशिक ब्युरो : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने काँग्रेसच्या कथित भूमिकेचा निषेध करण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. भाजपचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाले असून, आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. आंदोलनकर्त्यांनी काळे कपडे परिधान करून काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विरोधात निषेध व्यक्त केला.

भाजपच्या प्रमुख नेत्यांचा सहभाग

आंदोलनात भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा माजी मंत्री भारती पवार, नाशिकच्या महापौर हिमगौरी अडके, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, युवा नेत्या रश्मी हिरे, शहराध्यक्ष सुनील केदार, युवा नेते पंकज खताळ यांच्यासह भाजपचे नगरसेवक, मंडळ अध्यक्ष आणि विविध पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

काळे कपडे परिधान करून निषेध

आंदोलनासाठी भाजप कार्यकर्त्यांनी काळे वस्त्र परिधान केले होते. महिला कार्यकर्त्यांनी काळ्या साड्या अथवा काळे पंजाबी ड्रेस परिधान करून आंदोलनात सहभाग घेतला. अनेक कार्यकर्त्यांच्या हातात राहुल गांधी यांच्या विरोधातील निषेधाचे फलक होते.

आंदोलनादरम्यान ‘राहुल गांधी परत जा’, ‘गो बॅक राहुल गांधी’ यांसह विविध घोषणा देण्यात आल्या. काही कार्यकर्त्यांकडून उपरोधिक आणि घोषणात्मक स्वरूपातील मजेदार घोषणाही देण्यात आल्या.

पावसाच्या सरीतही आंदोलन सुरू

नाशिकमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असतानाही भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू ठेवले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर तसेच लगतच्या चौकात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमल्याने परिसरात गर्दीचे वातावरण निर्माण झाले.

ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी

जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा सत्र न्यायालय असलेल्या या महत्त्वाच्या परिसरात आंदोलनामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. ऐन गर्दीच्या वेळी आंदोलनासाठी मोठी गर्दी झाल्याने परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला.

रस्त्यावर कार्यकर्त्यांची गर्दी आणि घोषणाबाजी सुरू असल्याने वाहनचालकांना काही काळ संथ गतीने प्रवास करावा लागला. त्यामुळे शहराच्या मुख्य भागातील वाहतूक व्यवस्थेवर आंदोलनाचा परिणाम झाल्याचे चित्र दिसून आले.

राहुल गांधींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले

राहुल गांधी नाशिकमध्ये जिल्हा अध्यक्ष शिबिराच्या निमित्ताने आले असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने हे आंदोलन आयोजित केले. काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतल्याने नाशिकमध्ये काँग्रेस आणि भाजपमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी विविध घोषणा देत आपला निषेध नोंदवला. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.