पावसाळ्यात झाडांखाली थांबू नका; मुंबईकरांना महापालिकेचे सावधगिरीचे आवाहन

पावसाळ्यात झाडे किंवा फांद्या कोसळण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना झाडांखाली थांबू नये तसेच वाहने उभी करू नयेत, असे आवाहन केले आहे. धोकादायक झाडांबाबत तक्रारींसाठी १९१६ या नागरी सेवा क्रमांकावर संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

Jun 26, 2026 - 02:05
 0  3
पावसाळ्यात झाडांखाली थांबू नका; मुंबईकरांना महापालिकेचे सावधगिरीचे आवाहन
मुंबई पावसाळा, बीएमसी, झाडांखाली थांबू नका

मुंबई प्रतिनिधी: संदीप गिरकर 

मुंबई, दि. २५ जून : पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. पावसात झाडांखाली थांबणे टाळावे तसेच वाहनेही झाडांखाली उभी करू नयेत, असे स्पष्ट निर्देश महापालिकेच्या उद्यान विभागाने दिले आहेत.

महानगरपालिकेने पावसाळापूर्वी शहरातील अतिधोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून आवश्यक त्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी केली आहे. मात्र मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे झाडे किंवा फांद्या कोसळण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नसल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

उद्यान विभागाच्या माहितीनुसार, सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या काळात झाडांच्या फांद्या तुटणे किंवा झाडे कोसळण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे पावसापासून बचावासाठी झाडांचा आसरा घेणे धोकादायक ठरू शकते. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे आणि झाडांखाली गर्दी करणे टाळावे, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांतील विविध भागांमध्ये माहितीपत्रके प्रदर्शित करून जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

धोकादायक झाडांची तक्रार कुठे कराल?

इमारती, गृहनिर्माण संस्था, सोसायटी परिसर किंवा सार्वजनिक रस्त्यांलगत धोकादायक वाटणाऱ्या झाडांबाबत नागरिकांनी संबंधित विभाग कार्यालयातील (वॉर्ड) उद्यान विभागाशी संपर्क साधावा. तसेच तातडीच्या तक्रारींसाठी महापालिकेच्या १९१६ या नागरी सेवा क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.

सोसायटी किंवा खासगी परिसरातील धोकादायक झाडांची आवश्यक परवानगी घेऊन वेळेत छाटणी करून घ्यावी, जेणेकरून संभाव्य दुर्घटना टाळता येतील, असेही त्यांनी सांगितले.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.