पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तात्काळ हटवा; ‘पेडेस्ट्रियन फर्स्ट’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा – आयुक्त अश्विनी भिडे
मुंबईतील पादचाऱ्यांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि अडथळामुक्त करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका ‘पेडेस्ट्रियन फर्स्ट’ अभियान प्रभावीपणे राबविणार असून, पहिल्या टप्प्यात ३२० किलोमीटर पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत.
प्रतिनिधी : देवानंद शिंदे
मुंबई, दि. ३ ऑगस्ट २०२६ : मुंबईकर नागरिकांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि अडथळामुक्त व्हावा, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ‘पेडेस्ट्रियन फर्स्ट’ (Pedestrian First) अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात शहरातील सुमारे ३२० किलोमीटर लांबीच्या पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत.
पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले, अतिक्रमणे आणि पादचाऱ्यांच्या मार्गात अडथळा निर्माण करणाऱ्या सर्व बाबी तात्काळ दूर करून पदपथ पूर्णपणे अडथळामुक्त करण्याचे सक्त निर्देश महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले आहेत.
महानगरपालिका मुख्यालयात विविध विभागांची आढावा बैठक नुकतीच आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन पदपथांची सुधारणा, सुशोभीकरण आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले.
मुंबईतील सुमारे ५० टक्के दैनंदिन प्रवास पायी केला जात असल्याने पादचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि अडथळामुक्त पदपथ उपलब्ध करणे ही महापालिकेची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
सहायक आयुक्तांना दैनंदिन पाहणीचे निर्देश
सर्व प्रशासकीय विभागांतील सहायक आयुक्तांनी त्यांच्या विभागातील पदपथांची दररोज प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमणविरोधी कारवाईची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
केवळ अतिक्रमण हटवून कारवाई थांबविण्याऐवजी ते पुन्हा होणार नाही, यासाठी सातत्यपूर्ण देखरेख आणि नियमित पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
प्रत्येक दिवसाचा ‘Before’ आणि ‘After’ छायाचित्रांसह प्रगती अहवाल तपासणे संबंधित सहायक आयुक्तांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच विभाग स्तरावर दररोज आढावा घेण्यात येणार असून, उपआयुक्त प्रत्येक आठवड्यातून एकदा परिमंडळनिहाय कामाचा आढावा घेतील.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांकडून दर १५ दिवसांनी अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे. या मोहिमेत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा, दिरंगाई किंवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. आदेशाचे पालन करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिला.
शाळा, रुग्णालये आणि स्थानक परिसरांना प्राधान्य
पदपथांवर बांधकाम साहित्य, राडारोडा, बेवारस अथवा अयोग्य पद्धतीने उभी केलेली वाहने, कचऱ्याचे ढीग आणि असमान पृष्ठभाग यांमुळे पादचाऱ्यांना चालताना अडथळे निर्माण होतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी विशेषतः शाळा, रुग्णालये, रेल्वे स्थानके, मेट्रो स्थानके, बसस्थानके, बाजारपेठा तसेच मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असलेल्या परिसरातील पदपथांना प्राधान्य देऊन अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत.
या परिसरांतील पदपथ पादचाऱ्यांसाठी सुरक्षित, सुलभ आणि चालण्यायोग्य बनविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अनधिकृत फलक, होर्डिंग्ज आणि रॅम्प हटविणार
पदपथांवर लावण्यात आलेले अनधिकृत जाहिरात फलक, होर्डिंग्ज, इमारतींचे बाहेरच्या बाजूस उघडणारे दरवाजे, नियमबाह्य उंच रॅम्प आणि अन्य भौतिक अडथळे तात्काळ हटविण्यात यावेत, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
परवानाधारक विक्रेत्यांनी त्यांची विक्री, साहित्याची साठवणूक, स्टॉल आणि फलक केवळ त्यांच्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेतच ठेवले आहेत की नाही, याची संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित पडताळणी करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
नियमांनुसार नसलेले किंवा असमान रॅम्प काढून टाकावेत. इमारतींची प्रवेशद्वारे आणि दरवाजे मालमत्तेच्या हद्दीच्या आतील बाजूस उघडतील, याची खात्री करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
पदपथावर अडथळा निर्माण करणाऱ्या वृक्षांच्या फांद्यांची आवश्यकतेनुसार शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी करण्यात यावी. तसेच पदपथांवरील खड्डे, गॅप्स, पातळीतील तफावत आणि इतर भौतिक अडथळे दूर करून पदपथ सुरक्षित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नवीन पदपथांसाठी मानक डिझाइन बंधनकारक
पदपथांचे डिझाइन प्रचलित मानकांनुसार विकसित करण्यात यावे. नवीन पदपथांचे बांधकाम केवळ निर्धारित मानक डिझाइननुसार आणि एम-४० दर्जाच्या काँक्रीटमध्ये करण्यात यावे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
कोणत्याही परिस्थितीत पदपथांच्या बांधकामासाठी पेव्हर ब्लॉक किंवा स्टॅम्प काँक्रीटचा वापर करू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
पादचाऱ्यांची सुरक्षा वाढून वाहतूक कोंडी कमी होणार
पदपथांवरील अतिक्रमणे हटवून ते पादचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि चालण्यायोग्य केल्यास विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा लाभ होईल, असे आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले.
सुरक्षित आणि सुस्थितीत असलेल्या पदपथांमुळे पादचाऱ्यांची सुरक्षितता वाढेल, रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होईल आणि अधिकाधिक नागरिक पायी प्रवासाला प्राधान्य देतील. परिणामी रस्त्यांवरील वाहतुकीची कार्यक्षमता आणि वेग सुधारण्यास मदत होऊन वाहतूक कोंडी कमी होईल.
वाहतूक कोंडी कमी झाल्यास हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होऊन सार्वजनिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होईल, असेही आयुक्तांनी नमूद केले.
सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी प्राधान्यक्रमानुसार पदपथांची यादी तयार करून अतिक्रमणे पुन्हा होणार नाहीत यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा. पदपथांवर अडथळे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिला आहे.