घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि क्षेपणभूमींवर सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या; अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे निर्देश

मोशी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि क्षेपणभूमींवरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पावसाळी तयारी, एसओपी, स्थिरता परीक्षण, अग्निसुरक्षा आणि नियमित मॉक ड्रिलसह सर्व सुरक्षाविषयक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश दिले.

Jul 15, 2026 - 01:16
 0  5
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि क्षेपणभूमींवर सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या; अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे निर्देश
BMC, घनकचरा व्यवस्थापन, डॉ. विपिन शर्मा, मोशी दुर्घटना

मुंबई | प्रतिनिधी नरेश शिंदे 

पुणे जिल्ह्यातील मोशी येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि क्षेपणभूमीवरील सुरक्षेचा व्यापक आढावा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांमध्ये सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत पावसाळ्यापूर्व तयारी, अग्निसुरक्षा आणि प्रमाणित कार्यपद्धती (SOP) काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश दिले.

दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, प्रमुख अभियंता अविनाश काटे, संबंधित अधिकारी, प्रकल्प सल्लागार आणि विविध कंत्राटदार सहभागी झाले होते.

प्रत्येक प्रकल्पासाठी स्वतंत्र एसओपी तयार करण्याचे निर्देश

डॉ. विपिन शर्मा यांनी सांगितले की, आगामी पावसाळा आणि प्रतिकूल हवामान लक्षात घेऊन प्रत्येक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी स्वतंत्र प्रमाणित मानक कार्यपद्धती (Standard Operating Procedure - SOP) तयार करावी. सुरक्षाविषयक सर्व नियमांचे काटेकोर पालन करून संभाव्य धोके आधीच ओळखून त्यावर प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डम्पिंग ग्राऊंडवरील सुरक्षेवर विशेष भर

क्षेपणभूमीवरील (डम्पिंग ग्राऊंड) कचऱ्याची उंची निर्धारित मर्यादेत ठेवण्याचे निर्देश देत त्यांनी प्रकल्प परिसरात केवळ अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश देण्यास सांगितले. तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात यावे, असेही त्यांनी नमूद केले.

याशिवाय, परिसरातील शेड, कार्यशाळा, देखभाल कंटेनर आणि इतर संरचनांचे स्थिरता परीक्षण (Stability Audit) तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

जलनिस्सारण आणि उत्खनन पद्धतींची तपासणी

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्जन्य जलवाहिनी आणि पृष्ठभागीय जलनिस्सारण व्यवस्थेचे सर्वंकष परीक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच कांजूरमार्ग, देवनार आणि मुलुंड येथील बायोमायनिंग प्रकल्पांतील उत्खनन पद्धतींचा आढावा घेऊन सुरक्षित कार्यपद्धती सुनिश्चित करावी, असे निर्देशही देण्यात आले.

अस्थिर उत्खनन क्षेत्रांची ओळख करून तेथे योग्य बॅरिकेडिंग करण्यावर विशेष भर देण्यास सांगण्यात आले.

वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प आणि अग्निसुरक्षा

देवनार येथील वेस्ट-टू-एनर्जी (कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती) प्रकल्प तसेच वर्षानुवर्षे साचलेल्या लिगसी वेस्ट परिसरात आग आणि मिथेन वायूशी संबंधित धोक्यांचे परीक्षण करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

रिफ्यूज डिराईव्हड फ्यूएल (RDF) साठ्यामुळे आग लागण्याचा धोका टाळण्यासाठी विशेष दक्षता घेण्यास सांगण्यात आले. तसेच सर्व कर्मचारी आणि कामगारांसाठी नियमित मॉक ड्रिल आयोजित करण्याचे निर्देशही देण्यात आले.

अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश

प्रमुख अभियंता आणि उपप्रमुख अभियंत्यांनी एका आठवड्यात सर्व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांना भेट देऊन सुरक्षा उपाययोजना आणि कार्यपद्धतींच्या अंमलबजावणीचा प्रत्यक्ष आढावा घ्यावा, असेही डॉ. विपिन शर्मा यांनी स्पष्ट केले.

दुर्घटना टाळण्यासाठी सामूहिक जबाबदारी

डॉ. शर्मा म्हणाले की, सुरक्षितता ही प्रत्येक प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. क्षेपणभूमी खचणे, आग लागणे, यंत्रसामग्री अपघात किंवा उत्खननाशी संबंधित कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी संभाव्य धोके वेळेत ओळखून त्यांचे सातत्याने निरीक्षण करणे आवश्यक आहे.

अभियांत्रिकी तसेच कार्यान्वयन स्तरावर प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून धोके कमी करणे ही संबंधित विभाग आणि कंत्राटदारांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0