चिखली सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची अभिषेक बारणे यांच्याकडून पाहणी; प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या पुनर्वापरावर भर
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी चिखली येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा प्रभावी पुनर्वापर आणि पर्यावरणपूरक सांडपाणी व्यवस्थापनावर भर देण्यात आला.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी, दि. २४ एप्रिल २०२६ : पिंपरी चिंचवडचे वाढते शहरीकरण आणि भविष्यातील सांडपाणी व्यवस्थापनाची गरज लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी चिखली येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला (STP) भेट देत तेथील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
चिखली परिसरातील सांडपाणी व्यवस्थापन अधिक सक्षम आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी प्रकल्पाच्या संपूर्ण कार्यप्रणालीची माहिती घेत सांडपाण्याचे शुद्धीकरण कोणत्या स्तरावर केले जाते, तसेच प्रक्रिया केलेल्या पाण्याचा प्रभावी पुनर्वापर कसा करता येईल याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
शहरातील जलप्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध तांत्रिक उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला. उपलब्ध पाण्याचा पुनर्वापर करून नैसर्गिक जलस्रोतांवरील ताण कमी करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे अभिषेक बारणे यांनी सांगितले.
नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून त्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता आगामी काळात सांडपाणी व्यवस्थापन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भविष्यातील गरजा लक्षात घेऊन चिखली येथील प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यावर आणि प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0