ड्रग्ज फ्री मुंबई’ मोहिमेचा ३० जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबईतील विद्यार्थ्यांना आणि तरुणाईला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानाचा ३० जुलै २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. मोहिमेत शाळा, महाविद्यालये, पालक, डॉक्टर, स्वयंसेवी संस्था आणि विविध सामाजिक संघटनांचा सहभाग असणार आहे.
मुंबई प्रतिनिधी | नरेश शिंदे
शाळा-महाविद्यालयांतील अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याचे आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश
मुंबई, दि. २८ : मुंबईतील विद्यार्थी आणि तरुणाईला अंमली पदार्थ व व्यसनाधीनतेच्या विळख्यापासून दूर ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ गुरुवार, ३० जुलै २०२६ रोजी वरळी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
तरुणाईला व्यसनाधीनतेपासून रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि योग्य वयात योग्य वेळी समुपदेशन उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने नमूद केले आहे. व्यसनमुक्त मुंबईच्या दिशेने प्रयत्नांची सुरुवात शाळा आणि महाविद्यालयांपासून करण्याच्या उद्देशाने या व्यापक अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
अभियानाच्या समन्वयासाठी आज, २८ जुलै २०२६ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी संबंधित यंत्रणांना ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानात अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले.
मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी या मोहिमेअंतर्गत विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यासाठी पालक-शिक्षक संघटना, सार्वजनिक आरोग्य यंत्रणा, आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर, खासगी वैद्यकीय तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था आणि विविध सामाजिक संघटनांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे.
कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. वरळी येथे होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे.
महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी शालेय शिक्षण विभागाला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा शपथविधी कार्यक्रमात सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक तयारी करण्याच्या सूचना दिल्या. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महापालिका तसेच खासगी शाळांमधील विद्यार्थी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
अभियानाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच पालक-शिक्षक संघटनांनाही ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानांतर्गत घेण्यात येणाऱ्या शपथेची माहिती देण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. शाळा आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून व्यसनाधीनतेविरोधात व्यापक जनजागृती करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
या अभियानात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील रुग्णालयांचे डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, खासगी क्षेत्रातील डॉक्टर, सामाजिक संस्था तसेच सुमारे १५० स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत. याशिवाय गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांचे पदाधिकारीही ऑनलाइन पद्धतीने अभियानात सहभागी होतील.
वरळी येथे ३० जुलै रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी उपस्थित राहून व्यसनमुक्तीची शपथ घेणार आहेत. यावेळी अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करणाऱ्या प्रतिबंधात्मक पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानाचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बेस्ट उपक्रम आणि मुंबईतील मेट्रो स्थानकांवर व्यापक प्रसिद्धी करण्याचे निर्देशही महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत.
या अभियानात ऑनलाइन पद्धतीने सहभागी होण्यासाठी ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाचे अधिकृत संकेतस्थळ� येथे नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी संकेतस्थळावर आवश्यक माहिती भरून व्यसनमुक्तीची शपथ घेतल्यानंतर शपथ प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध होणार आहे.
मुंबईतील विद्यार्थी, पालक, शिक्षक, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांच्या सामूहिक सहभागातून तरुणाईला अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्याचा आणि व्यसनमुक्त समाज घडविण्याचा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1