'ड्रग्ज फ्री मुंबई' अभियानाला मोठा प्रतिसाद; मुंबईतील १०० हून अधिक महापालिका शाळांमधील ४ हजार विद्यार्थ्यांचा एकाचवेळी सहभाग
मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षातर्फे 'ड्रग्ज फ्री मुंबई' अभियानांतर्गत १०० हून अधिक महापालिका शाळांमध्ये एकाचवेळी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात ४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष तर शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी ऑनलाइन माध्यमातून सहभाग घेत व्यसनमुक्तीचा संदेश दिला.
मुंबई ब्यूरो : अनिल सावरे
मुंबई, दि. १३ जुलै २०२६ : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखेतर्फे राबविण्यात येणाऱ्या 'ड्रग्ज फ्री मुंबई' अभियानांतर्गत सोमवारी मुंबईतील १०० हून अधिक महापालिका शाळांमध्ये एकाचवेळी व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात ४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला, तर यूट्यूब लिंकद्वारे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनीही ऑनलाइन सहभाग घेतला.
दादर येथील सीव्हीएचसी सेंटर येथून सकाळी ११ ते १२ या वेळेत या विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या वाढत्या गैरवापराबाबत जागरूकता निर्माण करणे आणि व्यसनमुक्त जीवनशैलीचा संदेश पोहोचविणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश होता.
यावेळी पोलीस उपआयुक्त (अमली पदार्थ विरोधी कक्ष) पौर्णिमा चौगुले-शृंगी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर दुष्परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी निरोगी, व्यसनमुक्त आणि जबाबदार जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात मानसोपचारतज्ज्ञ आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील अभ्यासक डॉ. निलेश वसंत मोहिते यांनी विशेष मार्गदर्शन केले. तसेच माइंडसेट वेलनेस अँड हीलिंग संस्थेचे रिकव्हरी इंटिग्रेशन स्पेशालिस्ट अक्षय कुमार एस. शेट यांनी विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहण्याचे, मित्र-मैत्रिणींनाही व्यसनापासून परावृत्त करण्याचे आणि व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले.
या उपक्रमाला महापालिका शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकाचवेळी १०० हून अधिक शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबविण्याचा हा उपक्रम 'ड्रग्ज फ्री मुंबई' अभियानातील महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, व्यसनमुक्त, सुरक्षित आणि सशक्त मुंबई घडविण्याच्या दिशेने मुंबई पोलिसांनी उचललेले हे प्रभावी पाऊल असल्याचे सांगण्यात आले.
मुंबई पोलिसांनी नागरिक, पालक, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांना या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे. तसेच ड्रग्जची खरेदी, विक्री, तस्करी किंवा सेवनाबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास ती तातडीने पोलिसांना कळवून 'ड्रग्ज फ्री मुंबई' अभियानाला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0