ईएसआयसीच्या लाभांची माहिती आता क्यूआर कोडद्वारे; कामगारांसाठी डिजिटल सुविधा

ESIC Digital Services, ESIC QR Code, Akash Fundkar, Labour Minister Maharashtra, Employee State Insurance Corporation, ESIC Benefits, Workers Health Services, Maharashtra ESIC Society, ESIC Hospitals, Worker Welfare

ईएसआयसीच्या लाभांची माहिती आता क्यूआर कोडद्वारे; कामगारांसाठी डिजिटल सुविधा
ESIC Digital Services, ESIC QR Code, Akash Fundkar, Labour Minister Maharashtra, Employee State Insurance Corporation, ESIC Benefits, Workers Health Services,

प्रतिनिधी: देवानंद शिंदे 

कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते क्यूआर कोड व माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई, दि. १३ ऑक्टोबर २०२६ : कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) विविध लाभ आणि आरोग्य सेवांची माहिती विमाधारक कामगारांपर्यंत व्यापक स्वरूपात पोहोचविण्यासाठी डिजिटल सुविधांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. क्यूआर कोडच्या माध्यमातून विमाधारकांना ईएसआयसीच्या योजना, लाभ आणि आरोग्य सुविधांची माहिती सहज उपलब्ध होईल, असे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी सांगितले.

ईएसआयसीच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाने विकसित केलेल्या क्यूआर कोड आणि माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करताना ते बोलत होते.

क्यूआर कोडमध्ये विविध सेवा आणि सुविधांची माहिती

ईएसआयसीच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाने तयार केलेल्या क्यूआर कोडमध्ये महामंडळाचे विविध लाभ, नियोक्ता व कर्मचारी मार्गदर्शिका, शाखा कार्यालये, डीसीबीओ, दवाखाने, कर्मचारी राज्य विमा रुग्णालये, विमा वैद्यकीय व्यवसायी (आयएमपी) तसेच संलग्न रुग्णालयांची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.

या डिजिटल सुविधेमुळे विमाधारक कामगारांना आवश्यक माहिती मिळविणे अधिक सोपे होणार आहे. क्यूआर कोडचा व्यापक प्रसार करण्यासाठी तो सर्व क्षेत्रीय कार्यालये, महाराष्ट्र ईएसआय सोसायटी तसेच नियोक्ता आणि कर्मचारी प्रतिनिधींना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

रुग्णालयांमधून माहिती पुस्तिकांचे वितरण

कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली १२ मे २०२५ रोजी झालेल्या बैठकीत क्यूआर कोड आणि एसएमएस सेवेद्वारे ईएसआयसीच्या लाभांची माहिती प्रसारित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार मुंबई प्रादेशिक कार्यालयाने माहिती, शिक्षण व संवादविषयक पुस्तिका मुद्रित केल्या आहेत.

या पुस्तिकांचे वितरण राज्यातील कर्मचारी राज्य विमा योजना रुग्णालयांमधून करण्यात येणार आहे. त्यामुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना ईएसआयसीच्या उपलब्ध सुविधा व सेवांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

एसएमएसद्वारे माहिती देण्याची प्रक्रिया

विमाधारकांशी एसएमएसद्वारे संपर्क साधण्याची कार्यवाही मंजूर राष्ट्रीय धोरण आणि निर्धारित वापराच्या नियमांनुसार ईएसआयसीच्या मुख्यालयाकडून केंद्रीय स्तरावर केली जात आहे.

डेटा सामायिकरण करारानंतर १२ जुलै २०२६ रोजीची ४५ लाख ३४ हजार ७३७ विमाधारकांच्या निवासी पत्त्यांची व मोबाईल क्रमांकांची मागविलेली माहिती मुंबई प्रादेशिक कार्यालयाने १५ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र ईएसआय सोसायटीला उपलब्ध करून दिली आहे.

ईएसआयसीच्या डिजिटल सुविधा आणि माहिती पुस्तिकांच्या माध्यमातून विमाधारक कामगारांमध्ये योजनांविषयी जागरूकता वाढविणे तसेच उपलब्ध आरोग्य सेवा आणि इतर लाभांपर्यंत पोहोच सुलभ करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.