घाटकोपर मलजल प्रक्रिया केंद्राचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण करा; अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांची पाहणी
घाटकोपर पूर्व येथे उभारण्यात येत असलेल्या ३३७ MLD क्षमतेच्या मलजल प्रक्रिया केंद्राची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाहणी केली. संपूर्ण प्रकल्प ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून कामाला वेग देण्याचे निर्देश देण्यात आले.
प्रतिनिधी: देवानंद शिंदे
मुंबई, दि. ८ ऑक्टोबर २०२६ : मुंबईतील समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या घाटकोपर मलजल प्रक्रिया केंद्राचे (STP) काम निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. घाटकोपर (पूर्व) येथे सुरू असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची त्यांनी आज प्रकल्पस्थळी भेट देऊन पाहणी केली.
मुंबई मलनि:सारण प्रकल्पांतर्गत उभारण्यात येत असलेल्या या केंद्राची क्षमता ३३७ दशलक्ष लिटर प्रतिदिन (MLD) आहे. प्रकल्पासाठी सिक्वेन्शियल बॅच रिऍक्टर (SBR) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा विविध प्रयोजनांसाठी पुनर्वापर करण्याचे नियोजन असून, यामुळे समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासोबतच सागरी पर्यावरण आणि जलचर जीवनाच्या संवर्धनास मदत होणार आहे.
या प्रकल्पाचा लाभ घाटकोपर, मानखुर्द, गोवंडी आणि चेंबूर परिसरातील नागरिकांना होणार आहे.
स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत कामांचा आढावा
प्रकल्पस्थळाच्या पाहणीदरम्यान अभिजीत बांगर यांनी मलजल प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या विविध प्रक्रिया टाक्या, इनलेट व आउटलेट व्यवस्था, पंप हाऊस, स्लज प्रक्रिया युनिट, अंतर्गत पाइपलाइन तसेच अन्य स्थापत्य कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
याशिवाय पंप, एरेशन ब्लोअर्स, स्क्रीनिंग व स्लज प्रक्रिया यंत्रणा, विविध यांत्रिक उपकरणे आणि पाइपिंग यांच्या उभारणीचीही पाहणी करण्यात आली.
विद्युत अभियांत्रिकी कामांमध्ये ट्रान्सफॉर्मर, विद्युत पॅनेल, केबलिंग, मोटर्सना वीजपुरवठा, नियंत्रण व ऑटोमेशन प्रणाली, SCADA प्रणाली आणि बॅकअप वीज व्यवस्था यांचा आढावा घेण्यात आला.
मार्च २०२७ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
मलजलावर द्वितीय स्तरीय (Secondary) प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेल्या लिक्विड पाइपलाइनचे काम ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत, तर संपूर्ण मलजल प्रक्रिया केंद्राचे काम ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
हे उद्दिष्ट वेळेत साध्य करण्यासाठी प्रकल्पस्थळी आवश्यक मनुष्यबळ वाढविण्यात आले आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून सुमारे १ हजार मनुष्यबळ प्रकल्पस्थळी कार्यरत असून, प्रकल्प पूर्ण होईपर्यंत ही अतिरिक्त मनुष्यबळाची कुमक कायम ठेवण्याचे निर्देश अभिजीत बांगर यांनी दिले.
कामाचा वेग वाढविण्याचे निर्देश
प्रकल्पाचे काम विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व कामे समांतर पद्धतीने आणि वेगाने पूर्ण करावीत, अशा सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिल्या.
कामाच्या ठिकाणी गुणवत्ता, सुरक्षितता आणि कार्यक्षमता यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. प्रकल्पातील विविध कामांचा सातत्याने आढावा घेऊन निर्धारित वेळापत्रकानुसार काम पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे.
या पाहणीवेळी उपायुक्त (अभियांत्रिकी) शशांक भोरे, प्रमुख अभियंता (मुंबई मलनि:सारण प्रकल्प) राजेंद्र परब तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.