आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषद; मीराताई आंबेडकर यांना जीवनगौरव

चिंचवड येथील आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषदेत स्त्रीशक्ती, नेतृत्व, मानसिक स्वास्थ्य आणि भिक्खुनी परंपरेवर चर्चा. मीराताई आंबेडकर यांना जीवनगौरव पुरस्कार.

आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषद; मीराताई आंबेडकर यांना जीवनगौरव
आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषद, चिंचवड बातम्या, मीराताई आंबेडकर, जीवनगौरव पुरस्कार, बौद्ध महिला नेतृत्व, प्रा. विमल थोरात, बौद्ध भिक्खुनी परिषद, मानसिक स्वास्थ्य, जयभीम 2.0, बार्टी, पिंपरी चिंचवड बातम्या

प्रतिनिधी : रोहन सोनाळे 

चिंचवडमध्ये सुमारे एक हजार उपासक-उपासिकांची उपस्थिती; मीराताई आंबेडकर यांना जीवनगौरव पुरस्कार, विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव

पिंपरी, दि. १८ ऑक्टोबर २०२६ : बौद्ध धम्मातील प्रज्ञा, करुणा, सेवा आणि सामाजिक उत्तरदायित्वाची मूल्ये समाजात रुजवण्यासह महिला नेतृत्व, बौद्ध भिक्खुनी परंपरा, ऐतिहासिक योगदान आणि मानसिक स्वास्थ्य अशा विविध विषयांवर चिंचवड येथे आयोजित आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषदेत विचारमंथन करण्यात आले. शनिवारी (दि. १७ ऑक्टोबर) प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडलेल्या या परिषदेला सुमारे एक हजार उपासक-उपासिकांनी उपस्थिती लावली. या वेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

डॉ. उज्ज्वला अंदुरकर, डॉ. संध्या हरिभक्त, डॉ. वैशाली भामरे आणि लक्ष्मीकांता माने यांनी या परिषदेचे आयोजन केले होते. विस्डम इन मोशन, कॅटलिस्ट फाउंडेशन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली. ज्ञानातून नेतृत्व आणि संवादातून समाजनिर्मिती साधण्यासोबतच बौद्ध मूल्यांचा प्रसार करण्यावर परिषदेत भर देण्यात आला.

देश-विदेशांतील बौद्ध भिक्खुनी, अभ्यासक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्या आणि विविध क्षेत्रांतील महिलांनी परिषदेत सहभाग घेतला. बुद्ध अँथमवरील नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर व्हिएतनामी बौद्ध परंपरेतील मंत्रोच्चार सादर करण्यात आले.

तरुण पिढीने बुद्ध आणि आंबेडकरी विचार पुढे न्यावेत : प्रा. विमल थोरात

परिषदेच्या प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. विमल थोरात यांनी बुद्धांचा आणि आंबेडकरी विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी जनरेशन झेड अर्थात जेन झी पिढीने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘शिक्षित बना’ या संदेशाचे महिलांनी गांभीर्याने पालन केले असून, नवी शिक्षित पिढी घडवण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.

विशेष अतिथी मिलिंद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वैशाली प्रधान यांनी बोधगया महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची आणि महाराष्ट्रात स्वतंत्र पाली विद्यापीठ स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेण्याची मागणी केली. तसेच पुढील परिषद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयात आयोजित करण्याचे निमंत्रण त्यांनी दिले.

बौद्ध मूल्ये, भिक्खुनी परंपरा आणि महिलांचे ऐतिहासिक योगदान

प्रा. मनोरी पी. सेनानायके यांनी ‘बौद्ध मूल्ये : सेवा आणि सामाजिक उत्तरदायित्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या मूल्यांवर आधारित बौद्ध धम्म हा आदर्श जीवनमार्ग असून, ही मूल्ये समाजात रुजवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

भिक्खुनी महाकासा यांनी कोरियन भिक्खुनी संघाची जागतिक स्तरावरील प्रेरणादायी भूमिका व्हिडिओद्वारे मांडली. डॉ. रुपाली भामरे मून यांनी परदेशात आंबेडकरी विचारांचा प्रसार आणि भारतीय समुदायाची भूमिका यावर भाष्य केले. भिक्खुनी विसुद्धिपन्ना यांनी युद्धातून शांततेकडे वाटचाल करताना व्हिएतनामी बौद्ध भिक्खुनींच्या योगदानाची माहिती दिली, तर डॉ. योजना भगत यांनी शिलालेखांच्या आधारे बौद्ध महिलांच्या ऐतिहासिक प्रवासाचा वेध घेतला.

भिक्खुनी उप्पलवना थेरी (श्रीलंका), द्रुपॅान ग्यालतेन सामतेन (तिबेटी भिक्खुनी), भंते सुनीती आणि भिक्खुनी शाक्य धम्मदिना यांनी महिला भिक्खु संघाचा प्रवास, परंपरा आणि स्वतःचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले. विविध चर्चासत्रांमध्ये बौद्ध परंपरेतील महिलांचे स्थान, त्यांचे ऐतिहासिक योगदान आणि समकालीन नेतृत्व यावर चर्चा झाली.

धम्माच्या माध्यमातून मानसिक स्वास्थ्यावर मार्गदर्शन

मानसिक स्वास्थ्यावरील विशेष सत्रात डॉ. नीलम ओसवाल यांनी धम्माच्या तत्त्वज्ञानाच्या आधारे ताण, चिंता आणि मानसिक अस्वस्थतेचा सामना करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. धम्मातील विचार, सजगता आणि ध्यान यांचा जीवनात उपयोग करण्याचे महत्त्व या सत्रातून अधोरेखित करण्यात आले.

अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी आंबेडकरवादी विचारांशी जोडला गेलेला आपला प्रवास कथन केला. “माझ्यासाठी आंबेडकर हा नुसता विचार नाही, तर ती माझी जीवनप्रणाली आहे,” असे सांगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईची भूमिका साकारल्यामुळे आपल्या जीवनात झालेल्या बदलांविषयी त्यांनी अनुभव मांडले.

‘जयभीम २.०’ चर्चासत्रात नव्या पिढीच्या विचारांची चर्चा

‘जेन झींच्या काळात जयभीम २.०’ या चर्चासत्रात बीबीसीच्या दिल्लीतील पत्रकार छाया कविरे, लेखिका व कवयित्री मीनाक्षी इंगळे आणि डॉ. सांची कांबळे यांनी सहभाग घेतला. तरुण पिढीचा ‘जयभीम’ या विचाराशी नव्याने जोडला जाणारा संबंध, आंबेडकरी विचारांची समकालीन मांडणी आणि सामाजिक परिवर्तनातील युवकांची भूमिका यावर चर्चा करण्यात आली.

मार्गदर्शित ध्यानाच्या सत्राने परिषदेची सांगता झाली.

मीराताई आंबेडकर यांना जीवनगौरव पुरस्कार

परिषदेत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अॅड. रंजना भोसले, वैशाली शेलार आणि डॉ. मनीषा कर्णे यांना ‘वुमन ऑफ सबस्टन्स’ पुरस्काराने गौरविण्यात आले. तर मीराताई आंबेडकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला भिक्खुनी संघातील सदस्यांसह समाजकल्याण विभाग, पुणे येथील प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचूरे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपआयुक्त अण्णा बोदडे, नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे, डॉ. सुहास कांबळे आणि कतलाबोडीच्या सरपंच अर्चना खोब्रागडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

Mi Marathi Live — स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज!