कागल नूतन बसस्थानक विकास आणि दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण; २५० कोटींच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी पाठपुरावा करणार
कागल नूतन बसस्थानक हे विकास आणि दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण असल्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. कागलच्या २५० कोटींच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मान्यता घेऊन केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
प्रतिनिधी : उमेश जाधव
कोल्हापूर, दि. २३ (जिमाका) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील कागल नूतन बसस्थानक हे विकास आणि दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण आहे. कागलच्या पर्यटन विकासासाठी सुमारे २५० कोटी रुपयांच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मान्यता घेऊन केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. पर्यटन विभागाच्या कामांमध्ये कागलच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याचा प्राधान्याने समावेश करण्यात येईल, अशी ग्वाही पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याणमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
कागल येथील नूतन बसस्थानकाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे, माजी आमदार संजयबाबा घाडगे, कागल नगराध्यक्षा सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, विक्रमसिंह भैय्या पाटील, विरेंद्र मंडलिक, कागल नगरपरिषदेचे नगरसेवक, कोल्हापूर एस.टी. विभागाच्या विभाग नियंत्रक वृषाली भोसले, प्रादेशिक अभियंता नागेश कुलकर्णी, यंत्र अभियंता अनंत कुलकर्णी, स्थापत्य कंत्राटदार एस. एन. पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कागलच्या पर्यटन विकासाला चालना देणार
पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, दूरदृष्टीचे नेतृत्व मिळाल्यास भागाचा, मतदारसंघाचा आणि जिल्ह्याचा विकास कसा साधता येतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे कागलचे नूतन बसस्थानक आहे. बसस्थानकाशी संलग्न मार्केट कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार असून, त्यातून मिळणाऱ्या भाड्याच्या उत्पन्नातून बसस्थानकाचा विकास करण्यात येणार आहे.
कागल बसस्थानकाचा परिसर आणि इमारत स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कोल्हापूरला विमानतळाची सुविधा उपलब्ध असल्याने पर्यटकांची संख्या वाढत आहे. श्री क्षेत्र ज्योतिबा, पन्हाळा, महालक्ष्मी मंदिर आणि आंबा घाट या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. या पर्यटकांची पावले कागलकडे वळण्यासाठी कागलमध्ये दर्जेदार पर्यटनस्थळे विकसित करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन २५ कोटी रुपयांचा पर्यटन विकास प्रस्ताव पर्यटन विभागाकडे पाठविण्यात आला असून, त्याला मान्यता देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असे देसाई यांनी सांगितले.
साडेपाच कोटींच्या निधीतून सुसज्ज बसस्थानक
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, कागलचे जुने बसस्थानक अत्यंत दुरावस्थेत होते. ते सुसज्ज आणि अद्ययावत व्हावे, अशी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. शासनाने यासाठी सुमारे साडेपाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून सर्व सुविधांनी युक्त असे उत्कृष्ट नूतन बसस्थानक उभारण्यात आले आहे.
बसस्थानकात हिरकणी कक्षासह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कै. जयसिंगराव घाटगे यांच्या नावाने असलेल्या तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले असून, त्याच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव पर्यटन विभागाने मार्गी लावावा, तसेच कागलचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडाही मंजूर करावा, अशी विनंती मुश्रीफ यांनी केली.
नगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या वन विभागाच्या सुमारे २०० एकर जमिनीवर पर्यटन विकासासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
नूतन बसस्थानकाची योग्य निगा राखण्याचे आवाहन करताना त्यांनी नागरिकांनी तंबाखू, गुटखा खाऊन परिसर अस्वच्छ करू नये, असे सांगितले. एस.टी. महामंडळ ही सर्वसामान्यांच्या प्रवासाची महत्त्वाची रक्तवाहिनी असून तिचे जतन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.
दहा फलाटांसह अत्याधुनिक सुविधा
कोल्हापूर विभागाच्या विभाग नियंत्रक वृषाली भोसले यांनी प्रास्ताविकात सांगितले की, कागल येथील नूतन बसस्थानकाची इमारत सुमारे ५ कोटी ५० लाख रुपयांच्या मंजूर निधीतून बांधण्यात आली आहे.
या बसस्थानकात एकूण दहा फलाट असून पास व आरक्षण केंद्र, हिरकणी कक्ष, चालक-वाहक विश्रांतीगृह, स्वच्छतागृह, अतिथी कक्ष, पोलीस कक्ष आणि सुरक्षा कक्ष आदी सुविधांचा समावेश आहे.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे, माजी आमदार संजयबाबा घाडगे, कागल लोकनियुक्त नगराध्यक्षा सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, नगरसेवक प्रविण काळबर, कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैया माने आणि विरेंद्र मंडलिक यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून कागल नूतन बसस्थानकाचे लोकार्पण करण्यात आले तसेच कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार कागल व्यवस्थापक प्रमोद तेलवेकर यांनी मानले.
यावेळी एस.टी. महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी, एस.टी. विभागाच्या संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0