कचरा व्यवस्थापन ही सामूहिक जबाबदारी; विमानतळ परिसरातील बांधकामांबाबत नियमांचे पालन आवश्यक – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
कोल्हापूर विमानतळ परिसरातील घनकचरा व्यवस्थापन, अनधिकृत बांधकामे आणि विमानतळ सुरक्षा मानकांबाबत आयोजित कार्यशाळेत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी कचरा व्यवस्थापन ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. विमानतळ परिसरातील बांधकामांसाठी संबंधित विभागांचा ना हरकत दाखला आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर, दि. १५ (जिमाका) : कोल्हापूर विमानतळ परिसरात घनकचरा व्यवस्थापन आणि सुरू असलेली विविध बांधकामे विमानतळाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अडचणीची ठरू नयेत, यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले. कचरा व्यवस्थापन ही सामूहिक जबाबदारी असून प्रत्येक कुटुंबाने ती पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.
कोल्हापूर विमानतळ परिसरातील बांधकाम नियमितीकरण आणि घनकचरा विल्हेवाट विषयक एकदिवसीय कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यशाळेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, प्रांत अधिकारी मोसमी बर्डे-चौगुले, तहसीलदार स्वप्निल पवार, विमानतळ संचालक अनिल शिंदे, नागरी विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कदम, उदय गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सांगितले की, विमानतळ परिसरात सुरू असलेल्या किंवा भविष्यात होणाऱ्या बांधकामांसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण, महानगरपालिका आणि संबंधित ग्रामपंचायतींचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. विमानतळ सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन यांनी विमानतळ परिसरातील अनधिकृत बांधकामांची ओळख संबंधित ग्रामपंचायतींनी करून द्यावी, असे निर्देश दिले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक प्रांत अधिकारी मोसमी बर्डे यांनी केले. विमानतळ संचालक अनिल शिंदे यांनी विमानतळ परिसरातील विविध नियमावली आणि सुरक्षाविषयक निकषांबाबत सविस्तर माहिती दिली.
या कार्यशाळेला तहसीलदार, गटविकास अधिकारी, तलाठी, मंडल अधिकारी, क्रेडाईचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
