धान खरेदीसाठी १० तर नाचणीसाठी ५ केंद्रांना मान्यता; कोल्हापूर जिल्ह्यात ऑनलाइन नोंदणी सुरू

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम २०२६-२७ साठी कोल्हापूर जिल्ह्यात धान खरेदीसाठी १० आणि नाचणीसाठी ५ केंद्रांना मान्यता देण्यात आली असून १ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे.

धान खरेदीसाठी १० तर नाचणीसाठी ५ केंद्रांना मान्यता; कोल्हापूर जिल्ह्यात ऑनलाइन नोंदणी सुरू
धान खरेदी २०२६-२७, नाचणी खरेदी, कोल्हापूर धान खरेदी केंद्र, किमान आधारभूत किंमत योजना, MSP, ऑनलाइन नोंदणी,

प्रतिनिधी : उमेश जाधव 

कोल्हापूर, दि. १ : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम २०२६-२७ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून धान (भात) आणि भरडधान्याची खरेदी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत १ सप्टेंबर २०२६ पासून शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

यंदाच्या हंगामात जिल्ह्यात धान खरेदीसाठी १० केंद्रांना तर नाचणी खरेदीसाठी ५ केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी शासनाने निश्चित केलेल्या मुदतीत आपल्या नजीकच्या अधिकृत खरेदी केंद्रावर जाऊन ऑनलाइन नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

मागील हंगामात ३,७२२ शेतकऱ्यांची धानासाठी नोंदणी

मागील हंगामात जिल्ह्यातील ८ खरेदी केंद्रांवर ३ हजार ७२२ शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी १ हजार ५५४ शेतकऱ्यांकडून १६ हजार ४०० क्विंटल धान (भात) खरेदी करण्यात आले.

या खरेदीपोटी संबंधित शेतकऱ्यांना ३ कोटी ८८ लाख ४५ हजार २९८ रुपये इतकी रक्कम अदा करण्यात आली आहे.

नाचणीच्या ५ केंद्रांवर ४,६२४ क्विंटल खरेदी

भरडधान्य अर्थात नाचणी खरेदीसाठी मागील हंगामात ५ केंद्रांवर ५८४ शेतकऱ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी ३२४ शेतकऱ्यांकडून ४ हजार ६२४ क्विंटल नाचणीची खरेदी करण्यात आली.

या खरेदीपोटी शेतकऱ्यांना २ कोटी २५ लाख ९२ हजार ८६४ रुपये अदा करण्यात आले आहेत.

सोयाबीन खरेदीचीही नोंद

मागील हंगामात नाफेडच्या माध्यमातून सोयाबीन खरेदीसाठी दोन केंद्रांवर १७५ शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी ८३ शेतकऱ्यांकडून ८८५.५ क्विंटल नाचणी खरेदी झाल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले असून, संबंधित शेतकऱ्यांना ४७ लाख १७ हजार ९४४ रुपये अदा करण्यात आले आहेत.

यंदा नवीन केंद्रांची भर

यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या सोयीसाठी खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. मागील हंगामात सुरळीतपणे आणि विनातक्रार कार्यरत असलेल्या आजरा, अडकूर, कोल्हापूर, दारसेवाडी, कडगाव, चंदगड, राधानगरी, तुर्कवाडी आणि गडहिंग्लज येथील केंद्रांबरोबरच नवीन केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे.

निवेदनातील माहितीनुसार, कन्नड (कागल) आणि व्हानाळी (कागल) या ठिकाणी नव्या केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात एकूण ११ खरेदी केंद्रांवर प्रक्रिया पार पडणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

ऑनलाइन नोंदणी करून योजनेचा लाभ घ्या

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या कालावधीत आपल्या नजीकच्या अधिकृत खरेदी केंद्राशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी.

धान, नाचणी तसेच इतर भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेचा लाभ मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून खरेदी प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर आपल्या नजीकच्या अधिकृत खरेदी केंद्रावर ऑनलाइन नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.