कुर्ला भूस्खलन दुर्घटनेत महापौर रितू तावडे यांच्याकडून बचावकार्याची पाहणी; मृतांच्या वारसांना ४ लाख, जखमींना ५० हजारांची मदत

कुर्ला पश्चिमेतील अशोक नगर येथे भूस्खलन दुर्घटनेनंतर महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची पाहणी केली. मृतांच्या वारसांना ४ लाख आणि जखमींना ५० हजारांची मदत जाहीर.

Aug 13, 2026 - 17:07
 0  13
कुर्ला भूस्खलन दुर्घटनेत महापौर रितू तावडे यांच्याकडून बचावकार्याची पाहणी; मृतांच्या वारसांना ४ लाख, जखमींना ५० हजारांची मदत
कुर्ला भूस्खलन, कुर्ला दुर्घटना, मुंबई भूस्खलन, रितू तावडे, मुंबई महापौर, अशोक नगर कुर्ला, BMC,

प्रतिनिधी देवानंद शिंदे 

मुंबई, दि. १२ ऑगस्ट २०२६ : कुर्ला पश्चिम येथील अशोक नगर, टेकडी क्रमांक ३ परिसरात आज पहाटेच्या सुमारास झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेने परिसरात खळबळ उडाली. डोंगरउतारावरील माती आणि ढिगाऱ्याचा काही भाग २ ते ३ घरांवर कोसळल्याने जीवित आणि वित्तीय हानी झाली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्याची प्रत्यक्ष पाहणी केली.

महापौर तावडे यांनी घटनास्थळी उपस्थित विविध यंत्रणांकडून बचावकार्याची माहिती घेतली. तसेच पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन

त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला. बचावकार्य अधिक वेगाने आणि सर्व यंत्रणांमध्ये योग्य समन्वय राखून करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मृतांच्या वारसांना ४ लाख, जखमींना ५० हजारांची मदत

या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या वारसाला ४ लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा महापौर रितू तावडे यांनी केली. तसेच दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला वैद्यकीय उपचारासाठी ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून बचाव आणि मदतकार्याला वेग देण्यात आला असून, परिस्थितीवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे.

अरुंद मार्गामुळे बचावकार्यात मोठे आव्हान

दुर्घटना घडलेले ठिकाण आणि तेथे पोहोचण्याचा मार्ग अत्यंत अरुंद असून, या मार्गावरून एका वेळी केवळ एक व्यक्ती जाऊ शकेल एवढीच जागा उपलब्ध आहे. त्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढताना बचाव पथकांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

तरीही बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी व कामगार, मुंबई अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल (NDRF), मुंबई पोलीस, १०८ रुग्णवाहिका आणि इतर संबंधित यंत्रणा घटनास्थळी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

आतापर्यंत दोन मृतदेह बाहेर

प्राथमिक माहितीनुसार, बचाव पथकांनी आतापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढले असून दोन जखमी व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.

या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळी प्रभाग समिती अध्यक्ष विजयेंद्र शिंदे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, एल विभागाचे सहायक आयुक्त (प्रभारी) अनिल जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बचावकार्य पूर्ण होईपर्यंत घटनास्थळी सर्व संबंधित यंत्रणांचा समन्वय कायम ठेवण्यात आला असून, संपूर्ण परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.