‘माफसू’च्या विकासकामांना गती देण्याचे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे निर्देश
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या विकासकामांना गती देण्याचे निर्देश पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. शिक्षक-शिक्षकेत्तर पदभरती, विद्यार्थ्यांचे विद्यावेतन, पायाभूत सुविधा आणि शुल्क संरचनेचा आढावा घेण्यात आला.
प्रतिनिधी : नरेश शिंदे
शिक्षक-शिक्षकेत्तर पदभरती, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांचे विद्यावेतन आणि शुल्क संरचनेचा घेतला आढावा
मुंबई : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अर्थात ‘माफसू’च्या शैक्षणिक, प्रशासकीय आणि पायाभूत सुविधांशी संबंधित विकासकामांना गती देण्याचे निर्देश पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. पशुवैद्यक विज्ञान व पशुसंवर्धन पदवी (BVSc & AH) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना इतर वैद्यकीय शाखांप्रमाणे १८ हजार रुपये विद्यावेतन देण्याच्या प्रस्तावानुसार ४ कोटी १२ लाख रुपयांची तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्याची कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.
मंत्रालयात महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध महत्त्वाच्या विषयांचा मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, अधिष्ठाता डॉ. शिरीष उपाध्ये, कुलसचिव मोना ठाकूर, उपकुलसचिव डॉ. ए. पी. गांवडे आणि सहसचिव नि. भा. मराळे उपस्थित होते.
शिक्षक व शिक्षकेत्तर पदभरतीला प्राधान्य
विद्यापीठातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर पदांच्या भरती प्रक्रियेचा बैठकीत आढावा घेण्यात आला. रिक्त पदांची भरती प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या.
भारतीय पशुचिकित्सा परिषदेच्या (VCI) मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठात आवश्यक शिक्षकवर्ग उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आवश्यक शिक्षकवर्ग उपलब्ध करून देण्यासाठी पदभरती प्रक्रियेला प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले.
मुंबईसह विविध ठिकाणच्या पायाभूत प्रकल्पांचा आढावा
माफसूअंतर्गत सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा आणि बांधकाम प्रकल्पांची सद्यस्थिती तपासण्याचे निर्देशही मंत्री मुंडे यांनी दिले.
विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारती, रुग्णालये आणि वसतिगृहांशी संबंधित प्रकल्प मुंबई, नागपूर, परभणी, शिरवळ, उदगीर, वरूड आणि मोर्शी आदी ठिकाणी सुरू आहेत. या सर्व कामांचे प्रगतीनिहाय अहवाल तयार करून प्रकल्पांना गती द्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.
विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनावर विशेष भर
विद्यार्थ्यांचे विद्यावेतन, इंटर्नशिप भत्ता तसेच पशुवैद्यकीय आणि दुग्ध तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या शुल्क संरचनेबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
BVSc & AH अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना इतर वैद्यकीय शाखांप्रमाणे १८ हजार रुपये विद्यावेतन देण्याच्या प्रस्तावावर आवश्यक कार्यवाही वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. यासाठी ४ कोटी १२ लाख रुपयांची तरतूद करण्यासंदर्भातील प्रस्ताव आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्याची कार्यवाही करावी, असे मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश
विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावणे, विद्यार्थ्यांना हॉस्टेलसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर शासनाचा भर असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले.
तसेच विद्यापीठातील बांधकाम प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करावेत, शिक्षक व शिक्षकेत्तर पदांची भरती प्रक्रिया पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने राबवावी, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने आणि कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
माफसूच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासोबतच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, प्रशिक्षण आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0