अश्विनी भिडे यांचे निर्देश: मुंबईत स्वच्छतेसाठी ‘वॉर रुम’ स्थापन करा

मुंबईत स्वच्छता प्रभावीपणे राखण्यासाठी ‘वॉर रुम’ स्थापन करण्याचे आणि सहायक आयुक्तांनी नियमित क्षेत्र भेटी द्याव्यात, असे निर्देश अश्विनी भिडे यांनी दिले. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.

Apr 9, 2026 - 23:04
 0  1
अश्विनी भिडे यांचे निर्देश: मुंबईत स्वच्छतेसाठी ‘वॉर रुम’ स्थापन करा
मुंबई स्वच्छता, अश्विनी भिडे, BMC

मुंबई, दि. ९ : बृहन्मुंबई क्षेत्रात स्वच्छतेसंदर्भातील कामकाज अधिक प्रभावीपणे पार पडण्यासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष (वॉर रुम) स्थापन करावा आणि स्थानिक स्तरावर स्वच्छतेची खात्री करण्यासाठी सहायक आयुक्तांनी नियमितपणे क्षेत्र भेटी द्याव्यात, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले.

महानगरपालिका मुख्यालयात घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या विविध प्रकल्प, उपक्रम आणि कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी उप आयुक्त प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

आयुक्त भिडे म्हणाल्या की, स्वच्छता ही सतत चालणारी प्रक्रिया असून ती नियमितपणे प्रभावीपणे पार पडणे आवश्यक आहे. मुंबईतील सागरी किनारी रस्ते आणि महामार्गांवर सूक्ष्म पद्धतीने स्वच्छता राखणे गरजेचे आहे. यासाठी यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करण्यासाठी विशेष वाहने उपलब्ध करून द्यावीत. तसेच, कस्टमाईज्ड वाहने तयार करण्यासाठी सक्षम संस्थांची मदत घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

शहरातील काही वर्दळीच्या ठिकाणी आदर्श स्वच्छता निर्माण करून ती कायम राखण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता वाढवावी, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेने घनकचरा संकलनासाठी अद्ययावत वाहनांचा वापर सुरू केला असून त्यापैकी सुमारे १० टक्के वाहने ही इलेक्ट्रॉनिक (ई-व्हेईकल) आहेत. मोठ्या क्षमतेची इतक्या प्रमाणात ई-वाहने वापरणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिलीच महानगरपालिका असल्याची माहितीही त्यांनी दिली.

स्वच्छतेप्रती नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी आयोजित ‘मुंबई क्लीन लीग’ स्पर्धेत नागरिक आणि आस्थापनांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त किरण दिघावकर यांनी सविस्तर सादरीकरण करत सांगितले की, मुंबईत दररोज सुमारे ७२०० मेट्रिक टन घनकचरा संकलित करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. स्वच्छता व्यवस्थापनासाठी सेवा आधारित कंत्राट पद्धती अवलंबण्यात आली असून, नवीन क्षमतेची वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत.

मुंबईत सध्या ४६ ठिकाणी सुका कचरा विलगीकरण केंद्र कार्यरत आहेत, तर ९४ वाहने यासाठी पूर्णवेळ वापरली जात आहेत. तसेच, घरगुती सॅनिटरी कचऱ्याच्या संकलनासाठी विशेष सेवा सुरू करण्यात आली असून, या सेवेचा लाभ नागरिक आणि आस्थापनांकडून मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0