शीव (सायन) रुग्णालयाचा पुनर्विकास: मुंबईत दर्जेदार आणि मोफत आरोग्य सेवेला गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईतील शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या पुनर्विकासामुळे आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असून २०३० पर्यंत ३२८६ खाटांची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचा संकल्प व्यक्त केला.
मुंबई, दि. २७ मार्च — मुंबईतील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी राज्य सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल हॉस्पिटल च्या पुनर्विकासाच्या दुसऱ्या टप्प्याच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते.
या प्रकल्पासाठी सुमारे २५०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून नोव्हेंबर २०३० पर्यंत काम पूर्ण होणार आहे. नव्या इमारतीमुळे रुग्णालयाची क्षमता दुप्पट होऊन एकूण ३,२८६ खाटांची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामध्ये मुख्य इमारत, कर्करोग विभाग, आपत्कालीन सेवा आणि बाह्यरुग्ण विभागाचा समावेश असेल.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने देश-विदेशातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण येथे येतात. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येतो. नव्या प्रकल्पामुळे हा ताण कमी होऊन सर्वसामान्य नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल.
कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करून नव्या इमारतीत अत्याधुनिक कर्करोग उपचार सुविधा उभारण्यात येणार आहेत, ज्यामुळे टाटा मेमोरियल हॉस्पीटल वरचा ताण कमी होईल.
या कार्यक्रमात महापौर रितू तावडे यांनी ‘One City, One Health System’ या संकल्पनेचा उल्लेख करत सर्व रुग्णांना महानगरपालिका रुग्णालयांमध्ये सुलभ, समन्वित आणि दर्जेदार सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला. रुग्णांना वारंवार तपासण्या कराव्या लागू नयेत, वेळेवर सेवा मिळावी आणि सन्मानपूर्वक वागणूक मिळावी, यावर विशेष भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
शीव, धारावी, चेंबूर आणि वडाळा परिसरातील तसेच देशभरातून येणाऱ्या रुग्णांसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या नव्या सुविधांमुळे आरोग्य सेवांवरील ताण कमी होऊन अधिक कार्यक्षम सेवा उपलब्ध होतील, असा विश्वास स्थानिक आमदारांनी व्यक्त केला.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रुग्णालयात ‘ई-रुग्णवाहिका’ सेवांचेही लोकार्पण करण्यात आले.
What's Your Reaction?
Like
4
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0